Home /News /news /

लॉकडाऊन संपणार नाही; मोदींनी सांगितलं वेगळा असेल लॉकडाऊन 4.0

लॉकडाऊन संपणार नाही; मोदींनी सांगितलं वेगळा असेल लॉकडाऊन 4.0

आर्थिक पॅकेजची घोषणा करताना लॉकडाऊन संपलेला नाही, हे मोदींनी स्पष्ट सांगितलं. लॉकडाऊन 4.0 वेगळा असेल

    नवी दिल्ली, 12 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात स्वयंपूर्ण भारताची घोषणा केली. आर्थिक पॅकेजही जाहीर केलं. पण हा उद्देश साध्य करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेच लागतील हे स्पष्ट केलं. लॉकडाऊन संपलेला नाही, हे मोदींनी सांगितलं. लॉकडाऊन 4.0 वेगळा असेल. त्याचे नियम, स्वरूप लवकरच स्पष्ट करू, असं ते म्हणाले. कोरोनाव्हायरसचं संकट संपलेलं नाही, असं सांगताना पंतप्रधानांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायला हवेत, हे सांगितलं. आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी मास्क लावूनच काम करा. 18 तारखेनंतर चौथा लॉकडाऊन सुरू होईल. पण त्याचे नियम वेगळे असतील. त्याची माहिती 17 तारखेपर्यंत सविस्तरपणे सांगितली जाईल, असं ते म्हणाले.

    लॉकडाऊन 4.0मध्ये होणार असे बदल लॉकडाऊन 3 मध्ये राज्यांत जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आणि त्यानुसार जनजीवनात सूट देण्यात आली. याचा पुढचा टप्पा आता लॉकडाऊन 4 मध्ये असणार आहे. यात संपूर्ण जिल्हा हा रेड झोन जाहीर न करता, ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे, अशी प्रतिबंधित क्षेत्रं म्हणजेच कंटेन्टमेंट झोन वगळता जिल्ह्यात इतर सर्व ठिकाणी जनजीवन सुरळीत राहण्याची शक्यता आहे, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच्या एका बैठकीत दिले होते. रेड झोनमध्येही देणार सूट मोदींच्या या प्लॅननुसार रेड झोन म्हणून संपूर्ण जिल्ह्यातील व्यवहार ठप्प न होता, केवळ प्रतिबंधित क्षेत्रातील जनजीवनावरच त्याचा परिणाम होणार आहे. यामुळे देशातील सर्वच राज्यातील आर्थिक व्यवहारही बऱ्याच अंशी सुरळीत होण्याची शक्यता आहे. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या पर्यायाला सहमती दर्शवली तर चौथ्या डॉकडाऊनच्या टप्प्यात रेड झोन जिल्हे न राहता केवळ काही भाग राहण्याची शक्यता आहे. परराज्यातील मजूरांची अशी करणार सोय प्रत्येक राज्यातील परप्रांतीय मजुरांना पुढील 8 ते 10 दिवसांत त्यांच्या राज्यात पाठविण्यात येईल. मजुरांच्या स्थलांतरणामुळे दोन बाबी घडण्याची शक्यता आहे, ज्या राज्यांतून हे स्थलांतर होईल, त्या राज्यांमध्ये मजुरांची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या बाजूला, ज्या राज्यांत हे मजूर परततील त्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. ज्या राज्यांत रुग्ण संख्या वाढेल, त्या ठिकाणी अधिक तयारीत राहण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या