कोरोनाव्हायरस जगभरात थैमान घालतो आहे याला जवळपास 9 महिने झालेत. यावर प्रभावी औषध नाही किंवा लसही अजून बाजारात आली नाही. त्यावर जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत.
कोरोना रुग्णांवर वेगवेगळ्या औषधांचं ट्रायल सुरू आहे. शिवाय लशींचीही चाचणी घेतली जाते आहे. अशात आता भारतातल्या दोन विद्यापीठांच्या तज्ज्ञांनी रोपट्यामधील रासायनिक घटक कोरोनाव्हायसचा नाश करण्यात सक्षम आहे, असा दावा केला आहे.
गुरू गोविंद सिंग युनिव्हर्सिटी (GGSIPU) आणि पंजाब युनिव्हर्सिटीतील (PU) दोन प्राध्यापकांनी रोपट्यातील एका घटकाचा कोरोनाव्हायरसवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला.
PU च्या सेंटर ऑफ बायोलॉजी सिस्टम्सचे अध्यक्ष डॉ. अशोक कुमार आणि GGSIPU तील डॉ. सुरेश कुमार यांच्या मते, रोपट्यामध्ये जवळपास 50 असे पायथोकेमिकल आहेत, जे व्हायरसचा नाश करू शकतात.
पायथोकेमिकल रोपट्याचं मूळ, खोड, पानं, फळं आणि इतर भागांवर असलेलं रासायनिक तत्वं आहे. हे तत्वं रासायनिक प्रक्रिया करून काढून नंतर ते वापरता येऊ शकतं.
पायथोकेमिकल अनेक बॅक्टेरिया आणि व्हायरसच्या हल्ल्यापासून वाचवू शकतं, असं अभ्यासात दिसून आलं. डॉ. सुरेश यांनी सांगितलं, या रासायनिक तत्वाने कोरोनाच्या प्रोटिनवर हल्ला करून त्याला रोखलं.
जर कोरोनाचा प्रोटिन इतर प्रकारच्या तत्वाशी एकत्र झाल्यानंतर ते निष्क्रिय होत असेल तर संक्रमण पसरण्याचा धोका आपोआप कमी होतो.
हा अभ्यास सध्या कॉम्प्युटरवर करण्यात आला आहे. लवकरच हा प्राणी आणि माणसांवरही केला जाणार आहे. जेणेकरून हा उपाय किती प्रभावी ठरू शकतो, हे समजू शकेल. हे संशोधन आंतरराष्ट्रीय जर्नल फाइटोमेडिसीनमध्ये 3 सप्टेंबरला प्रकाशित करण्यात आलं आहे.