• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • Explainer : या देशांना अर्ध्या किमतीत पेट्रोल-डिझेलची निर्यात करतो भारत; जाणून घ्या काय आहे गणित

Explainer : या देशांना अर्ध्या किमतीत पेट्रोल-डिझेलची निर्यात करतो भारत; जाणून घ्या काय आहे गणित

Petrol-Diesel Export From India: भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनं दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एवढंच नाही तर, रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीच्या बाबतीत भारताचा जगातील टॉप 10 देशांमध्ये समावेश आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : भारत हा पेट्रोलियम पदार्थांचा एक मोठा आयातदार आणि पेट्रोलियम उत्पादनांचा मोठा निर्यातदार देश आहे हे आपल्याला माहीत आहे का? आपला देश स्वतःच्या गरजेच्या पूर्ततेसाठी आणि निर्यातीसाठी कच्चे तेल (Crude Oil) आयात करतो आणि ते शुद्ध करून अमेरिका, इंग्लंड आणि चीनसह अनेक देशांमध्ये निर्यात (Petrol-Diesel Export From India) करतो. या उत्पादनांच्या (पेट्रोल, डिझेल आदी) निर्यातीचा दर भारतातील या पदार्थांच्या किरकोळ किमतीच्या (retail price) जवळपास निम्म्या दराइतका आहे, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सध्या किरकोळ बाजारात पेट्रोलने प्रतिलिटर 110 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तीच स्थिती डिझेलची आहे. या दोन पदार्थांवर राज्य आणि केंद्र सरकार मिळून सुमारे 100 टक्के कर वसूल करतात. 2018 मध्ये माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार, त्यावेळी भारत 15 देशांना 34 रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल तर 29 देशांना 37 रुपये प्रतिलिटर दराने डिझेल निर्यात करत होता. इंडिया टुडे वेबसाइटनुसार, भारत सरकार आणि राज्य सरकारांनी किरकोळ पेट्रोलियम उत्पादनांवर भरभक्कम कर लावले आहेत, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात त्यांच्या किंमती खूप जास्त आहेत. ही माहिती सरकारच्या मंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडकडून आरटीआयद्वारे प्राप्त झाली आहे. त्यानुसार, 1 जानेवारी 2018 ते 30 जून 2018 या कालावधीत येथून हाँगकाँग, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर आणि यूएई येथे रिफाइंड पेट्रोलियम पदार्थांची निर्यात करण्यात आली. त्यावेळी पेट्रोल 32 ते 34 रुपये लिटर, तर डिझेल 34 ते 36 रुपये लिटर दराने निर्यात होत होतं. त्यावेळी देशातील किरकोळ बाजारात पेट्रोलचा दर 70 रुपये तर डिझेल 60 रुपये लिटर होता. भारत का करतो निर्यात आपल्या सर्वांना माहीत आहे की, भारत हा जगातील कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. देशात कच्च्या तेलाचं शुद्धीकरण करण्यासाठी सरकारी तसंच, खासगी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय स्तरावरील कंपन्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तराच्या तुलनेत या कंपन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणाचा खर्चही कमी आहे. त्यामुळे भारतही रिफाइंड पेट्रोल आणि डिझेलची लक्षणीय निर्यात करतो. भारताला मिळालेल्या या उत्पन्नामुळे देशात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. हे वाचा - IPS Officer Salary : कठीण प्रशिक्षणानंतर तयार होतात IPS अधिकारी; उच्च पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांना इतका असतो पगार जगातल्या टॉप 10 देशांमध्ये भारताचा समावेश भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनं दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एवढंच नाही तर, रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीच्या बाबतीत भारताचा जगातील टॉप 10 देशांमध्ये समावेश आहे. भारत अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि इराक, यूएईसारख्या तेल उत्पादक देशांना शुद्ध पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात करतो. 100 टक्के कर निर्यात केलेल्या रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांची किंमत जागतिक पुरवठा आणि मागणीच्या आधारावर निर्धारित केली जाते. यामध्ये तेल कंपन्यांची भूमिका विशेष नाही. दुसरीकडे, देशांतर्गत बाजारात विकल्या जाणार्‍या पेट्रोल आणि डिझेलवर सरकारने लादलेल्या करांमुळे त्यांची किंमत वाढते. या उत्पादनांवर राज्ये आणि केंद्र सरकारचा कराचा विचार केल्यास तो जवळपास 100 टक्के आहे. म्हणजेच, किरकोळ बाजारात पेट्रोलची किंमत आज 110 रुपये प्रतिलिटर असेल, तर याचा अर्थ आताच्या घडीला शुद्धीकरणानंतर पूर्ण तयार झालेल्या पेट्रोलची एकूण किंमत सुमारे 55 रुपये प्रतिलिटर आहे. हे वाचा - आता पाण्याच्या इंधनावर चालणार गाड्या; पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीत मोठा दिलासा गेल्या आर्थिक वर्षात कमी झाली निर्यात गेल्या आर्थिक वर्षात भारतातून रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत मोठी घट झाली होती. जागतिक कोरोना महामारीमुळं हा व्यापार कमी झाला. गेल्या आर्थिक वर्षात भारताने केवळ 42 मेट्रिक टन पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात केली होती. तर, त्याच्या मागील वर्षी म्हणजे 2019-20 या आर्थिक वर्षात सुमारे 66 मेट्रिक टन पेट्रोल आणि डिझेलची निर्यात केली होती. भारतात आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा रिफायनरी उद्योग आहे. तर, चीन पहिल्या क्रमांकावर आहे.
  Published by:News18 Desk
  First published: