मुंबई, 30 सप्टेंबर: भारतासह जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वच जगभरात नागरिक घरात आहेत. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंधनं आली आहेत. भारतातही सध्या लग्न समारंभाचा काळ असून, मोठ्या प्रमाणात लग्न होत आहेत. पण कोरोनाच्या या संकटात ही लग्नदेखील कमी लोकांच्या उपस्थितीत होत आहेत. या समारंभांना 50 व्यक्तींची परवानगी असून सर्व प्रकारची काळजी घेण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाउनच्या कालावधीत अनेक लग्न पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आता लग्न समारंभ होत असून काही बंधनांमुळं मोठ्या प्रमाणात आर्थिक बचतदेखील होत आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये लग्नसंस्थेला मोठं महत्त्व आहे. माणसाच्या आयुष्यातील सर्वांत जास्त खर्च हा त्याच्या लग्नातच होत असतो. त्यामुळे भारतात जवळपास सरासरी 10 ते 15 लाख रुपये एका लग्नाला खर्च येतो. पण कोरोनामुळं काही बंधन असून यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. या बचतीचा मोठा फायदा भविष्यात या जोडप्यांना होणार आहे. कमी पाहुणे आणि खर्च झाल्यामुळं 10 लाखाचं लग्न 5 लाख रुपयांमध्ये होत आहे.
कोरोनाच्या संकटात कमी पैशात लग्न फायदेशीर
कोरोनाने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यामुळे कमी पैशांत लग्न करून तो पैसा भविष्यासाठी साठवला जाऊ शकतो. यामुळे भविष्यात येणाऱ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. मुलीच्या आईवडिलांनादेखील यामुळे मोठा फायदा होणार आहे. भारतीय संस्कृतीत लग्नाचा जास्त खर्च हा मुलीची बाजू करते. त्याचबरोबर उरलेली रक्कम तुम्ही स्वतःला गिफ्ट मिळाली आहे असे समजून त्याची गुंतवणूक करू शकता. लग्नामध्ये कमी पाहुणे आल्यामुळं जेवणामध्ये आणि गिफ्टच्या पैशांमध्ये तुमची मोठी बचत होणार आहे.
या पद्धतीनं होऊ शकते बचत
समजा तुम्ही काही विशिष्ट रक्कम एफडीमध्ये गुंतवली तर तुम्हाला यावरील व्याज मिळू शकते. EPF,VPF, PPF, Equity funds यांसारख्या फंडांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. विविध बँकांमध्ये केलेल्या एफडीमध्ये तुम्हाला सहज 5 ते 6 टक्के परतावा मिळू शकतो. भविष्यात आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी देखील तुम्ही या रकमेचा वापर करू शकता. नवीन लग्न झालेल्या जोडप्याला स्वतःचे घर घेण्यास या पैशाचा उपयोग होऊ शकतो. तसेच घरामध्ये फर्निचर करण्यास आणि इतर गोष्टींसाठी पैसे उपयोगी पडू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Personal finanance, Savings, Wedding