उस्मानाबाद, 15 ऑगस्ट : उस्मानाबादमध्ये 2015 साली गाजलेल्या तरुणीच्या हत्या प्रकरणात प्रियकरासह तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पुणे आणि नंतर नागपूरला वास्तव्य केलेल्या तरुणीची तिच्या विवाहित प्रियकरानेच गळा चिरून हत्या केल्याची घटना डिसेंबर 2015 मध्ये घडली होती. आरोपींनी तरुणीचा अगोदर गळा चिरून हत्या केली व नंतर तिचा मृतदेह पोत्यात घालून विहिरीत फेकून पसार झाले होते.
खून होऊन 5 महिने झाले तरी आरोपीचा शोध लागला नव्हता. खून झालेल्या तरुणीने खून होण्याच्या काही दिवस अगोदर ऑनलाइन टॉप खरेदी केला होता. यावरून च पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत हा टॉप ज्या ग्राहकांच्या नावाने खरेदी केला, त्याचा शोध घेतला असता प्रकाश चाफेकर याचा शोध लागला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता हा खून त्यानेच केला असल्याचे निष्पन्न झाले. मयत तरुणी व चापेकर यांच्यात पुण्यात असताना प्रेमसबंध होते व चाफेकरच्या घऱी नागपूरला हे प्रकरण समजताच या दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यानंतर चापेकर याने पत्नी ,मेहुणा यांच्या मदतीने खुनाचा कट रचत उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली शिवारात खून केला व प्रेत विहिरीत फेकून पसार झाले.
पोलिसांनी या प्रकरणात आरोपी ताब्यात घेत पुरावे गोळा करत न्यायालया समोर हे पुरावे सादर केले. त्यानंतर आता उस्मानाबाद सत्र न्यायालयाने यात तिन्ही आरोपींना दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पोलिसांनी उस्मानाबाद पोलीस अधीक्षक राजतीलक रोशन यांच्या नेतृत्वात व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनसोड यांच्या मदतीने हा तपास केला व आरोपीला त्याच्या कृत्याची शिक्षा भोगण्यास भाग पाडल्याने उस्मानाबाद पोलिसांचे कौतुक होत आहे.