आजकाल सर्व व्यवहारांच्या सोयीसाठी सरकारनं नागरिकांना आपली बँक खाती आणि आधार क्रमांक एकमेकांना लिंक करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार अनेकांनी ही प्रक्रिया पूर्णदेखील केलेली आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करताना काळजी घेण्याची गरज आहे. बँक आणि आधार क्रमांकातील एक जरी अंक चुकला तरी एखाद्या व्यक्तीचं मोठं नुकसान होऊ शकतं. झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील 42 वर्षीय विडी कामगार जीतराय सामंत यांना हे नुकसान सोसावं लागलं आहे. एका महिलेच्या बँक खात्यातील पैसे काढल्याबद्दल पोलिसांनी सामंत यांना अटक केली आहे. तपासात असं समोर आलं की, दोन वर्षांपूर्वी या महिलेचं बँक खातं चुकून सामंत यांच्या आधार क्रमांकाशी लिंक झालं होतं. या खात्यामध्ये एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम होती. एका नजरचुकीमुळे जीतराय सामंत यांना तुरुंगात जावं लागलं आहे. 'इंडियन एक्सप्रेस'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जीतराय सामंत यांना दोन वर्षांपूर्वी जेव्हा देशात कोविड पसरलेला होता तेव्हा या पैशाबाबत माहिती मिळाली होती. देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागात अत्यावश्यक सार्वजनिक सेवा, कल्याणकारी योजना इत्यादींच्या वितरणासाठी काम करणाऱ्या एका कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे (सीएससी) सामंत यांना या पैशांबद्दल समजलं. या प्रकरणातील चौकशीची माहिती असलेल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थीच्या (सामंत) खात्यात जमा झालेले पैसे काढण्यास मदत करण्यासाठी सीएससीकडे एक बँक प्रतिनिधीदेखील होता.
पण, गेल्यावर्षी (2022) सप्टेंबरमध्ये झारखंड राज्य ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकाला श्रीमती लगुरी नावाच्या खातेदाराकडून एक तक्रार मिळाली. लगुरी यांच्या खात्यातील रक्कम नाहीशी झाल्याची तक्रार आल्यानंतर व्यवस्थापकानं अधिकाऱ्यांना पत्र लिहून काहीतरी चूक झाल्याची माहिती दिली. याचा सखोल तपास केला असता सामंत यांना चुकून पैसे मिळाल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर सामंत यांना हे पैसे परत करण्यास सांगितलं. ते तसं करू शकले नाहीत म्हणून त्यांच्याविरुद्ध ऑक्टोबरमध्ये आयपीसी कलम 406 (क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत जिल्ह्यातील मुफसिल पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला.
ऑक्टोबर 2022 ते मार्च 2023 या कालावधीत सामंत यांना CrPC कलम 41 A अन्वये पोलिसांसमोर हजर होण्यासाठी तीन नोटिसा मिळाल्या होत्या. ज्या अंतर्गत पोलीस एखाद्या व्यक्तीला वॉरंटशिवाय अटक करू शकतात.
पोलीस अधीक्षक आशुतोष शेखर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं, "जीतराय सामंत यांना 24 मार्च रोजी अटक करण्यात आली. नजर चुकीमुळे सामंत यांचा आधार क्रमांक दुसऱ्या महिलेच्या बँक खात्याशी लिंक झाला होता. हा गोंधळ लक्षात आल्यानंतर सामंत यांनी वापरलेली रक्कम परत केली नाही. हे प्रकरण इतर कोणाला समजू नये यासाठी त्यांनी सीएससी पॉईंटवर लाच दिल्याचा आरोप आहे. (जेव्हा पोलिसांनी या मुद्द्याबद्दल सामंत यांना नोटीस जारी केली होती). सामंत यांनी आम्हाला पत्र लिहून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना पैसे पाठवल्याचा दावा केला होता."
बँक व्यवस्थापक मनीष कुमार यांनी सांगितले, "पूर्वी, बँक ऑफ इंडिया ग्रामीण बँकेला स्पॉन्सर करत असे आणि आता एसबीआय स्पॉन्सर करत आहे. त्यामुळे एप्रिल 2019 मध्ये संपूर्ण डेटा एसबीआयमध्ये विलीन करण्यात आला आणि याच प्रक्रियेदरम्यान सामंत यांचा आधार क्रमांक चुकून दुसऱ्याच्या बँक खात्याशी जोडला गेला. संबंधित महिलेनंही या पूर्वी तक्रार केली नाही. नाहीतर आम्ही हा गोंधळ वेळीच थांबवू शकलो असतो. या साठी कोणत्याही एका बँक अधिकाऱ्याला दोषी ठरवणं योग्य नाही."
यूआयडीएआयच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, ही स्पष्टपणे बँकेची चूक आहे. यूआयडीएआयची यात कोणतीही भूमिका नाही.
इंडियन एक्स्प्रेसने डिसेंबरमध्ये सामंत यांच्याशी संपर्क साधला होता. त्या वेळी सामंत यांनी दावा केला होता की, पहिल्या लॉकडाउनदरम्यान, गावातील प्रत्येकजण आपापल्या आधार-लिंक केलेल्या बँक खात्यातील रक्कम तपासत होता. कारण, सरकारतर्फे लोकांना काहीतरी मदत मिळेल अशी घोषणा करण्यात आली होती. सामंत म्हणाले, "मीदेखील रीडिंग मशीनवर अंगठा लावला आणि मला खात्यात एक लाख 12 हजार रुपये शिल्लक असल्याचं दिसलं. यानंतर मी ग्रामीण बँकेत गेलो पण, तिथे पैसे कसे जमा झाले याची नोंद आढळली नाही. मी बँकेच्या अधिकाऱ्यांना याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितले की, सरकारनं ही रक्कम पाठवली असेल."
सहा मुलांचे वडील असलेले सामंत म्हणाले की, लॉकडाउनदरम्यान आर्थिक संकटात असताना त्यांनी हे पैसे वापरले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत सामंत यांनी एकूण दोन लाख रुपये या बँक खात्यातून काढले आहेत.
विशेष म्हणजे पोलिसांच्या एका नोटिशीला उत्तर म्हणून सामंत यांनी डिसेंबरमध्ये चायबासाचे पोलीस अधीक्षक आशुतोष शेखर यांना एक पत्रही लिहिलं होतं. त्यात त्यांनी दावा केला होता, "लॉकडाउनच्या काळात मोदी सरकार खात्यात पैसे पाठवत असल्याची चर्चा गावात होती. याच काळात माझ्या आधार-लिंक्ड खात्यात एक लाख रुपये शिल्लक असल्याचं दिसलं. तेव्हा मी चौकशी केली असता बँक मॅनेजर म्हणाले की, मी हे पैसे काढू शकतो. आता मात्र, माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात माझी चूक नाही. माझ्या माहितीशिवाय, माझा आधार कम्रांक दुसऱ्याच्या बँक खात्याशी लिंक केला गेला. गेल्या दोन वर्षांपासून बँकेनं याबाबत मला काहीही माहिती दिली नाही."
पांद्रसाली ऑब्झर्व्हेशन पॉइंटचे उपनिरीक्षक रतु ओरान यांनी सांगितलं, "पहिली नोटिस मिळाल्यानंतर सामंत पोलीस स्टेशनमध्ये आले होते. पण, त्यांनी रक्कम परत करण्याचं वचन दिलं नाही. साहजिकच, त्यांचा आधार क्रमांक श्रीमती लगुरी यांच्या बँक खात्याशी जोडला गेल्यावर चूक झाली होती. पण, ही रक्कम न वापरणं ही सामंत यांची नैतिक जबाबदारी होती." सामंत यांना या पूर्वीच अटक का करण्यात आली नाही, याबाबत विचारलं असता ओरान म्हणाले ही अर्जंट केस नव्हती. ते असंही म्हणाले की, सामंत यांच्या खात्यात सुरुवातीला फक्त 650 रुपये होते. नंतर त्यांनी 500 ते पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढली. पैसे काढताना खातेधारकाचं नाव दिसलं असेलच पण, सामंत यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank details