नागपूर,20 जून : एकीकडे संपुर्ण देशात विश्व योग दिवसाची तयारी सुरू आहे पण नागपुरात गेल्या 60 वर्षांपासून सुरू असलेले महाराजाबागेतील आसन मंडळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दररोज शेकडो लोक या मंडळात येत असतात पण आता आसन मंडळ बंद होणार असल्याने नागरिक चिंतेत आहे. नागपुरात मध्यवर्ती ठिकाणी शेकडो एकरात पसरलेल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या महाराजबाग प्राणि संग्रहालय आणि उद्यानात गेल्या साठ वर्षापासून योगाभ्यास मंडळ कार्यरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील दिवंगत गंगाधरराव फडणवीस यांनी स्थापन केलेल्या या योगाभ्यास मंडळाला बंद करण्याचे आदेश पीकेव्हीने दिल्याने नागरिक संतापले आहेत. वन्य प्राण्यांना त्रास होत असल्याच कारण पुढे करत हे योगाभ्यास मंडळ बंद करण्याचे आदेश पीकेव्हीने दिले असले तरी गेल्या काही वर्षात महाराजबाग परिसरात महापालिकेने रस्तेही बांधल्याने वाहनांचे आवाज वाढले आहे. असे असतांना नजर फक्त योगासनावर का असा प्रश्न कायम आहे. नागपूर शहरातील प्रतिष्ठित डाँक्टर्स, इँजिनिअर्स, वकील, अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक या योगाभ्यास केंद्रात येतात पण पीकेव्हीच्या निर्णयावर योगाभ्यासी संतापले आहेत. एकीकडे विश्व योग दिवसाचा प्रसार सुरू असतांना गेल्या साठ वर्षांपासून सुरु असलेले योगाभ्यास केंद्र बंद करण्याचे आदेश पीकेव्हीने काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. योगाभ्यासामुळे वन्य प्राण्यांना त्रास होत असल्याची सबब पुढे केली जात असली तरी या परिसरात मनपाने रस्ते तयार केले तेव्हा त्रास होत नाही का असा सवाल योगाभ्यासींनी उपस्थित केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.