मुंबई, 12 जून : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आयोगाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे, अशी माहिती राज्यसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे.
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/J4N1hZq9RY
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 17, 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पदभरती परीक्षांसाठी कमाल संधींची मर्यादा रद्द केली आहे. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आयोगाने परीक्षेसाठी अर्ज सादर करण्यासाठी 24 जूनपर्यंत मुदत वाढवली. एमपीएससीने शुक्रवारी परिपत्रक काढून ही माहिती दिली आहे. UPSC च्या धर्तीवर निर्णय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) धर्तीवर एमपीएससीने पदभरती परीक्षांसाठी कमाल संधींची मर्यादा लागू करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र, यात फेरबदल करून प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याबाबतचा निर्णय लागू करण्यात आला. या बदलामुळे काही उमेदवारांना अर्ज सादर करता आला नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करता येण्याच्या दृष्टीने अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. त्यानुसार आता उमेदवारांना 24 जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून शुल्क भरता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.