पुणे, 31 डिसेंबर : काल झालेल्या मंञी मंडळ विस्तारात भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना डावलल्याने भोर, वेल्हे, मुळशी तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. इतकंच नाही तर मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले असून पुण्यातील काँग्रेस भवनामध्ये कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली आहे. भवनातील सर्व खुर्च्या आणि वस्तू कार्यकर्त्यांनी फोडल्या आहेत. या पुढे या मतदारसंघात काँग्रेस पक्ष अस्तित्वात राहणार नाही तर संग्रामदादा थोपटे समर्थक म्हणून आम्ही काम करणार असल्याचे तीनही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. यापुढे भोर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेत्यांनी पाय ठेवल्यास त्यांचा जाहीर निषेध करण्यात येईल असंही भोर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनावणे यांनी म्हटले आहे. काँग्रेस भवनातील सर्व खुर्चा, टेबल, दरवाजे कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आले आहेत. अजूनही कार्यकर्ते भवनात असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी कारवाई करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. ‘गेली 50 वर्ष थोपटेंनी या मतदारसंघात पक्षाला मोठं केलं. ग्रामीण भागात काम करून पक्षाला वर आणलं. त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी पक्षासाठी कामं केलं. अनेकदा निवडूण येऊनही त्यांनी पक्ष सोडला नाही. पण तरीदेखील त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही कोणीही शांत बसणार नाही. भविष्यात काँग्रेसच्या एकाही मंत्र्याचा सत्कार या जिल्ह्यात होणार नाही’ आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. प्रणिती शिंदेंसाठी कार्यकर्त्याने उचलले टोकाचे पाऊल, सोनिया गांधींना लिहिले रक्ताने पत्र महाविकास आघाडी मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना संधी न मिळाल्याने नाराजी नाट्य सुरू झालं आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकमेव काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनाही पक्षाने डावल्याने आमदार शिंदेंसह त्यांचे समर्थक कमालीचे नाराज झाले आहेत. नाराजीचे पडसाद आता जिल्ह्यात ही उमटू लागले आहेत. आमदार प्रणिती शिंदेंवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी चक्क स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून ते काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींना पाठवलं आहे. काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे योगदान असतानाही त्यांना मंत्रिमंडळातून का डावल्यात आलं? असा प्रश्न ही त्यांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.