Home /News /news /

VIDEO: अपघातात जखमी झालं हत्तीचं पिल्लू; माणसाप्रमाणे CPR देऊन या अवलीयाने वाचवलं प्राण

VIDEO: अपघातात जखमी झालं हत्तीचं पिल्लू; माणसाप्रमाणे CPR देऊन या अवलीयाने वाचवलं प्राण

फोटो साभार- रॉयटर्स

फोटो साभार- रॉयटर्स

हत्तीच्या पिल्लाची (elephant Calf) प्रकृती खूपच चिंताजनक (bad injured) होती, पण या अवलीयाने त्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणलं आहे. पाहा VIDEO

    क्वालालंपूर, 25 डिसेंबर : रस्त्यावर जर एखादा अपघात झाला, तर पोलिसांच्या कचाट्यात सापडायला नको म्हणून जवळून जाणारी पण मदत न करणारी अनेकं लोक आपण सर्रासपणे पाहात असतो. मग एखादा प्राणी अपघातात सापडला तर काय कथा? एखाद्या प्राण्याचा अपघात झाला, ही लोकं त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. पण रस्ते अपघातात बेशुद्ध पडलेल्या एका हत्तीच्या पिल्लाचा जीव वाचवून एका व्यक्तीनं मानवतेचं दर्शन घडवून आणलं आहे. उपस्थित सर्वांना वाटत होतं की या हत्तीच्या पिल्लाचा मृत्यू झाला असावा, पण या व्यक्तीनं हार न पत्करता, या हत्तीच्या पिल्लाला मृत्यूच्या दाढेतून परत आणलं आहे. मानवतेचं दर्शन घडवून आणणाऱ्या या व्यक्तीचं नाव माना श्रीवाते असं आहे. त्याचं वय 26 वर्ष असून तो रेसक्यू कर्मचारी म्हणून काम करतो. त्यानं आतापर्यंत अनेकांचे जीव वाचवले आहेत. पण त्याने नुकतचं एका हत्तीच्या पिल्लात जीव ओतल्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. ही घटना थायलंडची असून रस्ता ओलांडताना हत्तीच्या पिल्लाचा चंथाबुरी येथे अपघात झाला होता. या अपघातात हे हत्तीचं पिल्लू गंभीर जखमी झालं होतं. या हत्तीच्या पिल्लाची प्रकृती खूपच चिंताजनक होती, पण मानाने त्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणलं आहे. मानाचा हा बचाव मोहिमेचा व्हिडिओ कोणीतरी सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये  माना आपल्या दोन्ही हातांनी हत्तीच्या पिल्लाची छाती दाबताना दिसत आहे. तो सीपीआर पद्धतीनं हत्तीच्या पिल्लाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. सीपीआर म्हणजे काय? कार्डिओ पल्मोनरी रीससिटेशन याचं संक्षिप्त रुप म्हणजे सीपीआर होय. एखाद्या आपत्कालीन स्थितीत व्यक्तीला किंवा प्राण्याला जीवंत ठेवण्यासाठी वापरली जाणारी उपचार पद्धती आहे. जेव्हा एखादी व्यक्ती श्वास घेणं थांबवते तेव्हा ती बेशुद्ध पडते. अशावेळी त्या व्यक्तीची छाती दाबली जाते. ज्यामुळे शरीरातील रक्तात आधीपासून उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा त्याच्या पूर्ण शरीराला केला जातो. यामुळे व्यक्तीला काही काळ जीवंत ठेवायला मदत होते. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत माना म्हणाला की- "मानवी शरीर आणि काही व्हिडीओ क्लिपच्या आधारे हत्तीचं हृदय कुठे असू शकतो, याचा मी अंदाज घेतला. आणि या प्राण्याचा जीव वाचवू शकेन असं मला वाटलं. यावेळी मी थोडा अस्वस्थही होतो कारण मी या पिल्लाच्या आईचं व इतर हत्तींचे आवाज ऐकत होतो. जेव्हा हे हत्तीचं पिल्लू पुन्हा चालू लागलं, ते पाहून मला रडायला आलं."
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Viral video.

    पुढील बातम्या