मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

देवा आता आज्ञा असावी...

देवा आता आज्ञा असावी...

15 सप्टेंबर : "देवा आता आज्ञा असावी..."असं म्हणत गणेशभक्तांनी आपल्या या लाडक्या बाप्पाला जडअंतकराने निरोप दिला. गेली 10 दिवस भक्तीभावाने सेवा करणार्‍या या गणेशभक्ताला आपल्या गणरायाला निरोप देतांना ऊर दाटून आला. त्यातच पावसाने हजेरी लावली त्यामुळे भक्तांच्या डोळ्यात आलेले अश्रूही जणू पावसात बाप्पाने पुसून काढले. भर पावसात चिंब भिजत "पुढच्या वर्षी लवकर या" असं वचन घेत गणेशभक्तांनी कुठे ढोल ताशांना निनाद, तर कुठे डीजेचा दणदणाटा तर कुठे मुक्त गुलालाची उधळण करत आपल्या लाडक्या राजाला वाजत गाजत निरोप दिला.ganpati visarjan

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' चा जयघोष करत गणराय निरोप देण्यात आला. राज्यभरात गणेश विसर्जनाला आज सकाळपासून मिरवणुकीला सुरुवात झाली. मुंबईत मोठे गणपती आणि पुण्यात पाचही मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटात निघाली. त्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे विसर्जन मिरवणूक संथ गतीने सुरू राहिली. संध्याकाळी साडेसातपर्यंत पुण्यातील मानाच्या गणपतींचं विसर्जन पार पडलं. पहिल्या मानाचा कसबा गणपतीचं चार वाजून 30 मिनिटांनी विसर्जन झालं. त्यानंतर मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन झालं. त्यानंतर तांबडी जोगेश्वरी, गुरूजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या पाचही मानाच्या गणपतींना पुणेकरांनी निरोप दिलाय. विशेष म्हणजे यंदा, सर्व मानाच्या गणपतींचं कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात येणार आहे. तर मुंबईत तेजूकाया, धोबी तलाव, सुतारगल्ली, चंदनवाडी मंडळाच्या गणपतींचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आलंय.

मुंबईत दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे अजूनही लालबागचा राजा आणि इतर मोठ्या गणपतींची विसर्जन मिरवणूक रात्रभर सुरू राहणार आहे. आणि पहाटे या राजांना निरोप दिला जाणार आहे. मुंबईसह औरंगाबाद, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर,सातारा, सांगलीमध्ये गणरायाला निरोप देण्यात आला. दरवर्षी बाप्पा येतो पण, ही दहा दिवस असतात त्याची..त्याच्या सेवेची..त्याच्या आरास आणि लाडाची पण या दहा दिवसांच्या मोबद्दल्यात आपल्या भक्ताच्या वाटेतील विघ्न दूर करण्याची जबाबदारी तो आपल्यासोबत घेऊन जातो..त्यामुळे देवा आता आज्ञा असावी चुकले आमचे काही देवा, तर माफी असावी.

पोलिसांवरील हल्ले थांबवं, ठाणेकरांचं बाप्पाला साकडं

ठाण्यात बाप्पाच्या विर्जनसाठी विसर्जन घाटावर भाविकांनी ज्या प्रमाणे गर्दी केली. त्याच प्रमाणे पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात देखील बाप्पाच विसर्जनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालाय. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तसेच ठाणे पोलिसांचं छेडछाड विरोधी पथक देखील विसर्जनासाठी तयार ठेवण्यात आल होतं. गेल्या 10 दिवस पाहुणचार केल्यानंतर बाप्पा गावाला जात असताना गणेश घाटावर आरती केल्यानंतर भाविकांनी चांगला पाऊस पडण्याबरोबरच पोलिसांवरील हल्ले थांबले पाहिजेत अशी मागणी देखील भाविकांनी केली आहे.

लोकबिरादरी प्रकल्पात गणपतीचं विसर्जन

गडचिरोली जिल्ह्यातल्या प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पातल्या गणपतीचीही आज विसर्जन करण्यात आलं. पर्लकोटा नदीच्या पात्रात हे विसर्जन करण्यात आलं. यावेळी प्रकाश आमटे आणि मंदाताई आमटे यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेत. लोकबिदारी प्रकल्पात दहा दिवसांचा उत्सव असतो.

चंद्रपुरात अडीच हजार गणपतींचं कृत्रिम तलावात विसर्जन

चंद्रपुर शहरात गणरायाची विसर्जन मिरवणूक उत्साहात झाली. मोठया गणपतीसह घरगुती गणपतीसाठी शहरात उत्साह दिसुन आला. चंद्रपुरातल्या अडीच हजार गणपतींचं यावेळी महापालिकेनं ठेवलेल्या कृत्रिम तलावात विसर्जन झाल्याने प्लास्टर ऑफ पॅरीससह मूर्तीच्या रसायनिक रंगामुळे होणारं मोठया तलावातलं प्रदुषण वाचवलंय. चंद्रपुरातला मोठा गणपती असलेल्या चंद्रपुरचा राजा या सार्वजनिक गणपतीची दुपारी विसर्जन मिरवणूक निघाल्यानंतर शहरातल्या विसर्जन मिरवणूक निघाल्या. शहरातल्या मुख्य चौक असलेल्या जटपुरा गेटजवळ भाविकांनी लाडक्या गणरायाची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: Bappa morya re, गणपती बाप्पा, गणेशोत्सव, बाप्पा, बाप्पा मोरया रे, मुंबई