
8 कोटी लोकसंख्या असलेल्या इराणमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या आधी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात तिथे उद्रेक झाला होता.

राष्ट्रपती हसन रूहानी (Hassan Rouhani) यांनी शुक्रवारी केलेल्या भाषणात देशातल्या 3.5 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना होऊ शकत अशी भीती व्यक्त केली.

अधिकृत आकडेवारीनुसार तिथे इराणमध्ये सध्या 269,440 लोकांना लागण झाली आहे. मात्र आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीचा आधार घेऊन राष्ट्रपतींनी ही भीती व्यक्त केली.

इराणमध्ये आत्तापर्यंत14 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर काही हजार रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून रुग्णांच्या संख्येत घट होत होती. मात्र आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कोरोनाने इराणमध्ये हाहाकार केला होता. मृतदेह पुरण्यासाठी अनेक मैदानांमध्ये कबरी खोदण्यात आल्या होत्या.

कोरोनाला रोखण्यासाठी इराणमध्येही लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्याचा मोठा फटका तिथल्या अर्थव्यवस्थेला बसला आहे.




