19 जून : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी मातोश्रीवर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे या भेटीनंतर सेना-भाजपमध्ये आलबेल असल्याचं वाटत असतानाच आज सेनेचं मुखपत्र सामनामधून भाजपवर टीका करण्यात आली आहे..महाराष्ट्राची सत्ता टिकेल पण काश्मीर टिकेल काय ? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. ‘राजकारणातील लढाया म्हणजे निवडणुका या जिंकण्यासाठीच असतात. त्यामुळे उद्या महाराष्ट्रात मध्यावधी झालीच तर ती जिंकण्याची भाषा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली आहे. अमित शहा व त्यांच्या पक्षाला मध्यावधी निवडणुका जिंकण्याचे वेध लागले आहेत व आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत.’ असं उपरोधिकपणे ‘सामना’मध्ये म्हटलं गेलंय.
काश्मीर आणि दार्जिलिंग येथे हिंसाचार भडकला आहे. काश्मिरात अतिरेक्यांचा उच्छाद आहे तर दार्जिलिंग येथे स्वतंत्र ‘गोरखालॅण्ड’साठी हिंसक आंदोलन सुरू आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दार्जिलिंग येथे पोलिसांबरोबर निरपराध्यांचे बळी गेले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दाखवूनही ते ऐकायला तयार नाहीत. आंदोलकांकडे सर्व प्रकारची हत्यारे आहेत. ईशान्येकडील उग्रवाद्यांकडून दार्जिलिंगमधील आंदोलकांना पाठबळ मिळत आहे व हा प्रकार गंभीर आहे. ममता बॅनर्जी यांच्याशी राजकीय मतभेद असू शकतात, पण दार्जिलिंगच्या पेटलेल्या होळीवर कोणी राजकीय पोळी भाजू नये इतकीच आमची अपेक्षा आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
जवानांवरील निर्घृण हल्ले वाढले आहेत. कश्मीरची भूमी रोज आमच्याच जवानांच्या रक्ताने न्हाऊन निघत आहे व भारतमाता की जय अशी आरोळी ठोकणे हा तेथे गुन्हा ठरत आहे, अशाही भावना अग्रलेखात व्यक्त झाल्यात.