अहमदाबाद, 20 नोव्हेंबर : पदव्युत्तर अभ्यासक्रमाचं पहिलं वर्ष संपल्यानंतर उन्हाळी सुट्ट्यांमध्ये इंटर्नशिप करता येते. यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नोकरीचा अनुभव मिळतो. तसंच एखाद्या प्रकल्पावर काम करण्याचा अनुभवही मिळतो. काही विद्यापीठांमध्ये समर इंटर्नशिप बंधनकारक आहे. अहमदाबादमधल्या भारतीय व्यवस्थापन संस्थेने अर्थात (Indian Institute of Management) ‘आयआयएम-अहमदाबाद’ने समर इंटर्नशिप 2021साठी (IIM Ahmedabad Summer Internship 2021) अधिसूचना जारी केली आहे. इंटर्नशिपसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 16 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. ही मोहीम पीजीपी प्रोग्रामसाठी (Post Graduation program) असून, संस्थेद्वारे 3 गटांमध्ये आयोजित केली जाते. या इंटर्नशिपसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी iima.ac.in या IIM च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. समर इंटर्नशिप भरती 2021 च्या पहिल्या क्लस्टरमध्ये गुंतवणूक बँकिंग ( Investment Banking), बाजार (Market), व्यवस्थापन सल्लामसलत ( Management Consulting), निश कन्सल्टिंग (Niche Consulting), कार्ड आणि वित्तीय सल्ला-सेवा (Cards and Financial advisory), खासगी इक्विटी (Private Equity) आणि उद्यम भांडवल आणि मालमत्ता व्यवस्थापन (Venture Capital & Asse) या समूहांनी सहभाग घेतला होता. समर इंटर्नशिप भरती 2021च्या वेळापत्रकानुसार, क्लस्टर 2 हे 19 नोव्हेंबर 2021 म्हणजे आजपासून सुरू झालं आहे. कोरोना महामारीमुळे या वर्षी संपूर्ण प्रक्रिया व्हर्च्युअली आयोजित केली जात आहे. तसंच सहभागी कंपन्यांपैकी कोणतीही कंपनी कॅम्पसला भेट देणार नाही. तिसरं क्लस्टर 22 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित केलं जाणार आहे. प्रत्येक क्लस्टर संपल्यानंतर संस्था अहवाल प्रकाशित करते, ज्यामध्ये प्रत्येकाला निकालाची माहिती दिली जाते. या क्लस्टरमध्ये मोठमोठ्या कंपन्या विद्यार्थ्यांना समर इंटर्नशिप ऑफर करत आहेत. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपने (Boston Consulting Group) तब्बल 26 विद्यार्थ्यांना समर इंटर्नशिप ऑफर केली आहे. किर्नीने (Kearney) 24 जणांना इंटर्नशिप ऑफर दिली. अल्वारेझ आणि मार्सेल, आर्थर डी लिटल, ऑक्टस अॅडव्हायझर्स, मॅकिन्से अँड कंपनी या कंपन्यांनी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल उपक्रमही सुरू केले आहेत. यामुळे संस्थेला प्लेसमेंट प्रक्रिया प्रभावीपणे चालविण्यात मदत होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव नसतो. त्यामुळे कामाचा अनुभव घेण्यासाठी कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची संधी इंटर्नशिपद्वारे मिळते. इंटर्नशिपमध्ये कामाव्यतिरिक्तही अनेक गोष्टी शिकता येतात. तसंच अनुभव, दृष्टिकोन आणि आपल्यातली क्षमता, कमतरता यांची जाणीव येते. शिकलेल्या पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग कसा करावा, हे इंटर्नशिपमध्ये आपण शिकतो. इंटर्नशिपमुळे आपला सर्वांगीण विकास होत असतो. त्यामुळे इंटर्नशिप करण्याची आवश्यकता असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.