वाघा बॉर्डर, 1 मार्च : विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं सोडलं असून ते भारत आणि पाकिस्तानची सीमा असलेल्या वाघा बॉर्डजवळ आले असल्याची बातमी आली आहे. त्यांचं एक्झिट सर्टिफिकेट पाकिस्ताननं अजूनही दिलेलं नसल्याची बातमी येत होती. वाघा बॉर्डरवर असणारे न्यूज18चे प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनंदन लाहोरमध्येच असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे अभिनंदन यांचं आगमन नेमकं केव्हा होणार याभोवतीचा सस्पेन्स वाढला होता. पण अखेर त्यांना पाकिस्तानातून भारतात सोडण्यात आलं.
नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानचं जेट F-16 लढाऊ विमानं पाडताना भारताचं मिग-21 हे विमान पाकिस्तानच्या भूमीत पडलं. यावेळी जखमी अवस्थेतील अभिनंदन वर्तमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. मात्र भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून आलेल्या दबावानंतर पाकिस्ताननं अभिनंदन याची सुटका करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज अभिनंदन यांची सुटका होणार असल्यानं संपूर्ण देशात जल्लोषाचं वातावरण आहे.
कोण आहेत विंग कमांडर अभिनंदन ?
- 19 जून 2004 मध्ये भारतीय हवाईदलात दाखल
- मिग-21 बायसन लढाऊ विमानाचे वैमानिक
- अभिनंदन यांचे वडील एस. वर्तमान निवृत्त लष्करी अधिकारी
- एस.वर्तमान यांनी एअर मार्शलपद भूषवलं
काय आहे जीनिव्हा करार?
- सैनिक पकडलेल्या क्षणी करार लागू होतो
- युद्धकैदी कुणाला म्हणावं आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीचे आंतरराष्ट्रीय नियम लागू
- युद्धकैद्याला धर्म,जात, जन्माबद्दल विचारता येत नाही
- नाव, सैन्यातलं पद, नंबर आणि युनिटबद्दल चौकशी शक्य
- युद्धकैदी सैनिकाची जबरदस्तीनं चौकशी करता येत नाही
- युद्धकैद्याला खाण्यापिण्याची आणि वैद्यकीय सुविधा देणं अनिवार्य
- युद्धकैद्याला गुन्हेगार म्हणून वागणूक देता येत नाही
- कैद्यांना कायदेशीर मदत देणं बंधनकारक
- युद्धकैद्यांवर खटला चालवला जाऊ शकतो
- युद्ध संपल्यानंतर युद्धकैद्यांना मायदेशाच्या हवाली करणं बंधनकारक
- दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धकैद्यांचा मुद्दा गाजल्यानंतर 1949 साली 194 देशांकडून कराराला मान्यता