मुंबई, 29 जुलै : हाडांची झीज होणं, हाडं ठिसूळ होणं आदी समस्यांमागे अनेक कारणं असू शकतात. खरं तर या समस्यांचा आज कोट्यवधी लोक सामना करत आहेत. ऑस्टिओपोरोसिस या आजारात अशा प्रकारच्या समस्या उद्भवतात. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय, त्याचं निदान कसं होतं. ऑस्टिओपेनिया आणि ऑस्टिओपोरोसिसमध्ये काय फरक आहे? यावर कसे उपचार केले जातात? या विषयी बेंगळुरू येथील रिचमंड रोडवरील फोर्टिस हॉस्पिटलचे ट्रामा अँड ऑर्थोपेडिक्स, बोन अँड जॉईंट सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. साई कृष्ण बी. नायडू यांनी माहिती दिली आहे. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय ? कमकुवत हाडं किंवा हाडांचं वस्तूमान, घनता कमी झाल्याने ती हाडं ठिसूळ होतात. सध्या भारतातील सुमारे एक कोटींहून अधिक लोक या आजाराचा सामना करत आहेत. सुरुवातीला रुग्णांमध्ये या आजाराची कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. परंतु, हळूहळू पाठदुखी आणि कालांतराने उंची कमी होण्यास सुरूवात होते. वयानुसार आपली उंची कमी होते का? होय, या आजारामुळे उंची कमी होते. अंशतः डिस्क डिहायड्रेशनमुळे मणक्याचे नुकसान होते आणि गंभीर ऑस्टिओपोरोसिसमध्ये बहुस्तरीय व्हर्टिब्रल फ्रॅक्चरमुळे उंचीमध्ये लक्षणीय घट होऊ शकते. या आजाराचा कोणाला धोका आहे ? वृद्ध लोकांना आणि रजोनिवृत्ती झालेल्या महिलांमध्ये हा आजार सामान्यपणे दिसून येतो. त्याशिवाय आयटी व्यावसायिक, कार्यालयीन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसारख्या बैठं काम करणाऱ्या आणि घरातल्या मुलांना ऑस्टियोपेनिया होण्याचा धोका असतो. व्हिटॅमिन डी आणि सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे हा त्रास होतो. निष्क्रियतेमुळे हाडं कमकुवत होतात. हाडांच्या रिमॉडेलिंग अॅक्टिव्हिटीमुळे हे होतं. त्यामुळे दिवसाला सरासरी पाच ते सहा हजार पावलं चालणं फायदेशीर ठरतं. एसएलई, संधिवात किंवा अवयव प्रत्यारोपणासारख्या वैद्यकीय स्थितीत रुग्ण कॉर्टिकोस्टिरॉईड्सवर असतात. या उपचारांमुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. गॅस्ट्रोइंटेस्टिनल आजार, आतड्यांसंबंधी शस्त्रक्रिया आणि मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता असते. या रुग्णांना 1200 IU आणि 700 IU या प्रमाणात कॅल्शियम असलेला पौष्टिक आहार दिला तर व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होऊ शकते. ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टियोपेनियामध्ये काय फरक आहे? ज्या तरुणांमध्ये सक्रियतेचा अभाव असतो, त्यांच्यात ऑस्टिओपेनिया सौम्य स्वरुपात आढळतो. यास कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरताही पूरक ठरते. तपासणी आणि निदानातून या दोन्हींपैकी कोणती समस्या आहे हे स्पष्ट होतं. ऑस्टिओपोरोसिसचं निदान कसं केलं जातं? रुग्णाचं वय आणि आरोग्यविषयक इतिहास यावरून चाचण्यांचं नियोजन तज्ज्ञ करतात. सामान्यतः डेक्सा (DEXA) स्कॅनमुळे या आजाराचं निदान होतं. तसंच ऑस्टिओपोरोसिसमुळे फ्रॅक्चर झालं असेल तर फ्रॅक्चर रिस्क असेसमेंट टूल अर्थात एफआरएएक्स या मोफत ऑनलाइन टूलचा निदान करण्यासाठी वापर केला जातो. हा आजार कसा रोखता येतो? स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी अॅक्टिव्हिटीज करणं सर्वात महत्त्वाचं आहे. सूर्यप्रकाशात चालणं, व्यायाम करणं आणि कॅल्शियम, व्हिटॅमिन डीयुक्त पोषक आहार घेतल्याने हाडं मजबूत होतात. रजोनिवृत्तीनंतर महिलांनी नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. कोणत्याही आजारामुळे त्रस्त असाल तर ऑस्टिओपोरोसिसविषयीसुद्धा डॉक्टरांशी चर्चा करावी. या आजारावर उपचार कसे केले जातात? रुग्णाची स्थिती, अन्य आजार आणि तपासणीतील निष्कर्षांनुसार उपचारांची दिशा ठरते. हा आजार असलेल्या तरुणांना रोज व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स घेण्याचा सल्ला दिला जातो. ऑस्टिओपोरोसिस असलेल्या महिला आणि पुरुषांना बिस्फोस्फोनेटस जसे की अॅलेंड्रोनेट, झोलेड्रॉनिक अॅसिड आदी औषधे गरजेनुसार दिली जातात. रजोनिवृत्ती झालेल्या महिलांना हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपीची गरज असते. यासाठी रॅलोक्सिफेन फायदेशीर ठरतं. वृद्ध पुरुषांना ऑस्टिओपोरोसिस हा टेस्टोस्टेरॉनच्या पातळीत घट झाल्याने होतो. टेरिपार्टाइड, अॅबॅलोपार्टाइडसारखी हाडांसाठी पोषक औषधे ऑस्टेक्लास्टिक अॅक्टिव्हिटी कमी करून आजाराचा धोका कमी करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.