सुशील शर्मा, प्रतिनिधी महेंद्रगढ, 26 जुलै : आज 26 जुलैला संपूर्ण देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. ज्या वीर जवांनांनी आपल्या भारत मातेसाठी हसत हसत मृत्यूला कवटाळले, त्या भारत मातेच्या वीर शहीद सुपूत्रांचे स्मरण केले जात आहे. 26 जुलै 1999 हा दिवस भारतीय सैन्याच्या शौर्यासाठी, पराक्रमासाठी ओळखला जातो. या दिवशी भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे हा दिवस कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या युद्धात अनेक भारतीय जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. यापैकी एक म्हणजे शहीद हवलदार लेखराम. हरयाणाच्या महेंद्रगढच्या सोहला येथील ते रहिवासी होते. हवालदार लेखराम ऑपरेशन विजयदरम्यान, बटालिक सेक्टरमध्ये 22 ग्रेनेडियर्स अल्फा कंपनीच्या फायर बेस एरियात पुनर्रचना आणि मदत संस्थेला शस्त्रे आणि दारूगोळा वितरीत करणाऱ्या टीमचा एक भाग होते.
3 जुलाई,1999 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घनाघस क्षेत्रात शत्रूंच्या बाजूने मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. त्यावेळी लेखराम हे आपल्या भारतीय सैन्यातील साथीदारांना शस्त्रे आणि दारूगोळा पुरवत राहिले. मात्र, याचदरम्यान, त्यांच्या पोटात एक स्पलिंटर लागला. यामुळे ते जखमी होऊन धारातिर्थी पडले आणि भारत मातेसाठी शहीद झाले.
वीरांगना कृष्णा देवी यांनी सांगितले की, 8 एप्रिल रोजी त्यांचे पती सुट्टी संपल्यानंतर परत भारत मातेच्या सेवेसाठी ड्युटीवर गेले होते. त्यांनी लवकरच परत येईन, असे वचन दिले होते. मात्र, बरोबर दोन महिन्यांनी 3 जुलै 1999 रोजी, त्यांचे पती कारगिल युद्धात शहीद झाल्याची बातमी आली. त्यांचा मृतदेह आल्यावर त्यांच्या पत्नीला तो ओळखताही आला नाही. पतीच्या मृत्यूमुळे जणू काही त्याचे सगळे जगच संपले होते. त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा करमपाल हा फक्त आठ वर्षांचा, मोठी मुलगी पूनम ही 6 वर्षांची, धाकटी मुलगी मनीषा ही 2 वर्षांची तर त्या त्यावेळी दोन महिन्याच्या गर्भवतीही होत्या. पत्नीच्या निधनानंतर सर्व काही उद्धवस्त झाले, असे त्यांना वाटत होते. मात्र, नंतर सरकारकडून त्यांना गॅस एजन्सी देण्यात आली. त्यांचे जेठ आणि दिरानेही त्यांना मदत केली. आता त्या चांगल्याप्रकारे आयुष्य जगत आहेत. मात्र, आपल्या पतीची आठवण आल्यावर त्यांचे डोळे आजही भरुन येतात. मोठा मुलगा सरपंच तर लहान सैन्यदलात लेखराम हे देशासाठी जेव्हा शहीद झाले, त्यावेळी त्यांच्या पत्नी कृष्णा देवी या दोन महिन्यांच्या गर्भवती होत्या. नंतर कृष्णा देवी यांनी यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. यावेळी शहीद पत्नी कृष्णा देवी यांनी मुलाच्या जन्मानंतरच ठरवले होते की, त्या आपल्या धाकट्या मुलाला देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित करतील. यानुसार त्यांनी आपल्या मुलाला प्रेरित केले. त्या त्यांना त्याच्या वडिलांच्या कहाण्या सांगायच्या. मुलाने त्याच्या शहीद वडिलांचा चेहरा पाहिला नव्हता. मात्र, आईकडून वडिलांच्या कहाण्या ऐकून तो खूप प्रभावित झाला आणि त्यानेही आपल्या वडिलांसारखे सैन्यदलात जाण्याचे ठरवले. फक्त 19 वर्षांचा असतानाच शहीद हवालदार लेखराम यांचा मुलगा वडिलांच्याच बटालियन अल्फा कंपनी, ग्रेनेडियर 18 मध्ये शिपाई या पदावर भरती झाला. सद्यस्थितीत तो पिथौरागढ काला पानी नावाच्या ठिकाणी चीन सीमेवर देशसेवा करत आहे. तर तेच त्यांचा एक मोठा मुलगा कर्मपाल हा आपल्या सोहला गावाचा सरपंच आहे.