कोल्हापूर, 16 जून : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या चार विचारवंतांच्या हत्या गेल्या काही वर्षात झाल्या.. त्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, लेखक एम एम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांचा समावेश आहे आणि या सगळ्या हत्याबाबत आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. धर्मरक्षणासाठीच गौरी लंकेश यांची हत्या केली अशी कबुली हल्लेखोर परशुराम वाघमारेने दिली.
20 ऑगस्ट 2013
स्थळ - पुणे
डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची हत्या
20 फेब्रुवारी 2015
स्थळ - कोल्हापूर
कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या
30 ऑगस्ट 2015
स्थळ - धारवाड
डॉक्टर एम एम कलबुर्गींची हत्या
5 सप्टेंबर 2017
स्थळ- बंगलोर
पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या
या चार हत्यांनी संपूर्ण देश हादरून गेला...चारही विचारवंत... सत्य लिहीत होते... बोलत होते...सर्व धर्मातील कुरिती, अंधश्रद्धांविरोधात आवाज उठवत होते. पण एका विचारधारेला त्यांचा आवाज बंद करायचा होता. म्हणून लेखणी चालवणाऱ्या या विचारवंतावर गोळ्या चालवल्या गेल्या. एका बाजुला महाराष्ट्रात दाभोलकर आणि पानसरेंच्या हत्येसंदर्भात नेमलेल्या तपास यंत्रणांनी हात टेकले. पण कर्नाटकच्या विशेष तपास पथकानं गौरी लंकेश यांच्या हत्येच्या षडयंत्राचा पर्दाफाश केलाय. हत्येच्या आरोपाखाली अटक केलेल्या परशुराम वाघमारेनं धर्मरक्षणासाठीच गौरी लंकेश यांची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिलीय.
पुन्हा एकदा महाराष्ट्र कनेक्शन
गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासात पुन्हा एकदा महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं. तब्बल सहा जणांना अटक केली गेली.
के टी नाविनकुमार
मनोहर येडवे
सुजितकुमार ऊर्फ प्रवीण
अमोल काळे ऊर्फ भाईसाब
अमित देग्वेकर
परशुराम वाघमारे
हे 6 जणही कट्टर हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित आहेत. यातल्या परशुरामच्या चौकशीत अनेक गोष्टींचा उलगडा झालाय.
- परशुरामनंच गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या चालवल्या
- त्याने बेळगावात पिस्तुल चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं
- तो अनेक दिवस गौरी लंकेश यांच्या मागावर होता
- कर्नाटकमधील सिंदगीत राहणारा परशुराम हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित
- कलबुर्गी, पानसरे आणि गौरी लंकेश या तिन्ही हत्या एकाच पिस्तूलातून झाल्याचा संशय
- 7.65 mm च्या पिस्तूलाचा वापर झाल्याचा एसआयटीचा अंदाज
दाभोलकर आणि पानसरे हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलीस आणि सीबीआयला हायकोर्टानं अनेकवेळा फटकारलं. पण तपासात कुठहीही प्रगती झाली नाही. कर्नाटक एसआयटी लंकेश यांच्या हत्येचा उलगडा करु शकते तर मग महाराष्ट्र एसआयटी का नाही असा सवाल पानसरे कुटुंबीय विचारत आहेत.