किशोर गोमाशे, प्रतिनिधी वाशिम, 23 मे : मंदबुध्दी मुलगी त्रास देत असल्याने वैतागलेल्या पित्याने तिची धारधार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. हत्येनंतर मृतदेह खताच्या रिकाम्या गोणीत फेकून दिला. ही घटना मालेगाव शहरात उघडकीस आली असुन केवळ तीन दिवसात मालेगाव पोलिसांनी शहरात आढळलेल्या मानवी सांगाड्यावरून आरोपीला शोधले आहे. मालेगाव शहराच्या जुन्या इरळा रस्त्यालगत असलेल्या एका शेताच्या धुऱ्याजवळ खताच्या गोणीत मानवी सांगाड्याचे तुकडे सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. यावरून मालेगाव पोलिसांत गुन्हा नोंदवून तपास हाती घेण्यात आला होता. मालेगाव ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन परिसरात गेल्या सहा महिन्यापासून शहरातील वेगवेगळ्या भागातून तीन मुली बेपत्ता आहेत. मात्र, त्यातील एक मुलगी बेपत्ता असूनही तिच्याविषयी कोणत्याही प्रकारची मिसिंग केस दाखल नव्हती. यावर मालेगाव पोलिसांनी अधिक तपास करून मालेगाव शहरातील जिल्हा परिषद शाळेजवळ असणाऱ्या मुख्तार खान (वय 60 वर्षे) याला ताब्यात घेतले. वाचा - 13 वर्षीय मुलीचा 8 वर्षात 15 पुरुषांसोबत विवाह; संपूर्ण प्रकरण जाणून हादराल सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल केली. मात्र, तांत्रिक बाबी व फॉरेन्सिक टीमच्या मार्गदर्शनामुळे पोलिसांनी आरोपीला खाक्या दाखवताच आरोपी मुक्तार खान याने रईसा ही 22 वर्षीय मुलगी मंदबुद्धी असल्याने आणि तिच्या वागण्यामुळे रागाच्या भरात आपणच तिची डोक्यात धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याचे कबूल केले. यावरून मालेगाव पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरीता ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन तडसे, सारिका नारखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवी सैबेवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास कोकाटे, प्रशांत वाढनकर, आशिष बिडवे आणि पोलीस कर्मचारी अमोल पाटील, जितू पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली.