मुंबई, 29 मे : मागील वर्षी देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झालेली असताना देखील अमेठीमध्ये एक गाव आहे जेथे अजूनही सोयी सुविधां अभाव आहे. अनेक वर्षांपासून या गावात वीज येण्यासाठी ग्रामस्थ विभागीय अधिकाऱ्यांकडे चकरा मारत आहेत. पण यागावची स्थिती अजूनही बदललेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे अमेठीतील लोकप्रतिनिधी देखील या गावातील विकास कामांकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा स्थितीमध्ये ग्रामस्थांची चिंता वाढू लागली आहे. अमेठी जिल्ह्यातील संग्रामपूर विकास गटाच्या मदौली गावातील विजय नगर मधील ही घटना आहे. जिथे गावात रस्ता, पाणी आणि इतर मूलभूत सुविधा आहेत. परंतु आजतागायत इथे वीज पोहोचलेली नाही. विजेसाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा वरिष्ठांकडे मागणी केली. मात्र त्यानंतरही गावात वीज आलेली नाही. आता अशी परिस्थिती आहे की गावकऱ्यांना अंधारात राहावे लागत आहे. या गावात जवळपास 2 डझनहून अधिक घरे आहेत, परंतु यात राहणारे ग्रामस्थ त्यांचं जीवन अंधारात जगत आहेत. गावातील रहिवासी अजय कुमार सांगतात की, 12 वर्षांहून अधिक काळ आम्ही येथे राहात आहोत मात्र अद्याप येथे वीज पोहोचलेली नाही. याच गावातील अमन कुमार या विद्यार्थ्याने सांगितले की, येथे विजेची समस्या आहे, उन्हाळ्यात साप-विंचू बाहेर पडतात, त्यांच्यापासूनही आमच्या जीवाला धोका असतो परंतु वीज नसल्याने अनेकदा दुर्घटना घडतात. कोणत्याही परिस्थितीत या गावात वीज आणावी, अशी आमची मागणी आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत आता विद्युत अभियंता यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी कॅमेरावर बोलण्यास नकार दिला आहे. संपूर्ण प्रकरण त्यांच्या लक्षात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे ते पहिले जाईल आणि या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.