नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर: दिवाळी (Diwali 2021) किंवा दीपावली (Deepawali 2021) हा एक प्रमुख हिंदू सण आहे. दिवाळी सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला साजरा केला जातो. यावेळी दिवाळी 4 नोव्हेंबर 2021 रोजी साजरी केली जाणार आहे. दिवाळी सणानिमित्त सर्वजण आपल्या घरामध्ये स्वच्छता करतात. अशा परिस्थितीत तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे खूपच फायदेशीर ठरेल.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पुराणांमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यातील महत्त्वाच्या सहा गोष्टी पुढे दिलेल्या आहेत. त्यांचा अवलंब केल्यास देवी खुश होते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करते, असं म्हटलं जातं.
दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी भक्तांच्या घरी वास्तव्यास येते, असं मानलं जातं. त्यामुळे देवीच्या स्वागतासाठी घराच्या मुख्य दारावर तोरण लावावं. आंबा आणि केळीच्या पानांपासून तयार केलेलं तोरण अतिशय शुभ समजलं जातं. ते उपलब्ध नसतील तर तुम्ही तोरण तयार करण्यासाठी फुलांचाही वापर करू शकता.
देवी आपल्या घरात यावी यासाठी घराच्या मुख्य दरवाज्याजवळ देवीच्या पावलांचे ठसे उमटवावेत. बाजारामध्ये पावलांच्या आकाराचे छाप मिळतात. ते कुंकुवामध्ये बुडवून तुम्ही ठसे उमटवू शकता. ठसे उमटवताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, हे ठसे घराच्या आतमध्ये येत असल्याचं दिसलं पाहिजे. असं केल्यास, तुम्ही देवीला घरी येण्यासाठी निमंत्रण देत आहात हे दिसून येतं.
दिवाळीच्या पूर्वी संपूर्ण घराची साफसफाई करून घ्या. घरातील सर्व वस्तू नीटनेटक्या ठेवा. कारण, ज्या घरामध्ये स्वच्छता आणि नीटनेटकेपणा नसतो त्या घरी लक्ष्मी वास करत नाही, असं म्हटलं जातं.
घराची स्वच्छता करण्यासोबतच घरातील फर्निचरसुद्धा व्यस्थित असलं पाहिजे. त्याची योग्य दिशांना मांडणी केल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते. घराचं मुख्य दार स्वच्छ असावं. याशिवाय दरवाज्यातून करकर असा आवाज येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी त्याला वेळोवेळी तेलपाणी घातलं पाहिजे.
दिवाळीच्या अगोदर दररोज सायंकाळी थोडं कच्च दूध आणि मध एकत्र करून ठेवावं. सकाळी या मिश्रणाचे दोन भाग करावेत. त्यातील एक भाग कुटुंबातील सदस्यांच्या अंघोळीच्या पाण्यात वापरावा तर दुसरा भाग घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडावा. त्यामुळे घराची शुद्धी होते आणि नकारात्मक उर्जा नष्ट होते, असं मानलं जातं. दिवाळीच्या मंगल मुहूर्तावर ही गोष्ट केल्यास चांगलं आरोग्य आणि समृद्धी मिळते.
पाण्यामध्ये फुलांच्या पाकळ्या आणि मेणबत्त्या तरंगत ठेवणं, ही गोष्ट वास्तूशास्त्रामध्ये अतिशय चांगली मानली जाते. दिवाळीच्या काळात लिव्हिंग रूममध्ये एखाद्या पसरट भांड्यामध्ये पाणी, फुलांच्या पाकळ्या आणि दिवे लावून तुम्ही ठेवू शकता.
आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा असणं आवश्यक आहे. म्हणून देवीला प्रसन्न करण्यासाठी वरती दिलेल्या गोष्टी कराव्यात, असं सांगितलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diwali 2021, Diwali-celebrations