औरैया, 16 मे : शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशातील औरैया इथे भीषण रस्ता अपघात झाला. फरिदाबादइथून 81 मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि ट्रेलची जोरदार धडक झाली. या अपघातात जवळपास 23 मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर 20 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातासंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अपघातामध्ये आणखी 24 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला असता पण चहाच्या तलफमुळे या सगळ्यांचा जीव वाचल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जर 24 पेक्षा अधिक मजूर चहा पिण्यासाठी खाली उतरले नसते तर त्यांनाही जीव गमवण्याची वेळ आली असती. दिल्लीहून आलेल्या डीसीएम (मिनी ट्रक) मधील काही लोक चहा पिण्यासाठी ढाब्यावर थांबले होते, त्यावेळी राजस्थानहून येणारा दुसरा ट्रक धडकला. जे बाहेर उतरले होते ते वाचले. उर्वरित दोन वाहनांमध्ये 24 जणांनी आपला जीव गमावला, 35 लोक जखमी झाले.
डीसीएममधील बहुतेक कामगार बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील होते. बराच प्रवास केल्यावर ते औरैयाजवळील चिरुळी परिसरातील एका ढाब्यावर पोहोचले. रात्री ते तिथेच थांबले पण यातील काहींना दुसऱ्या दिवशीचा सुर्य पाहता आला नाही. काळ्या रात्रीने काही क्षणांत सर्वकाही संपवलं.
पहाटेपूर्वी चहा पिण्यासाठी थांबले मजूर
पहाट होण्यापूर्वी मजुरांना चहा पिण्याची तलफ लागली आणि कदाचित या चहामुळे त्यांचे जीवन वाचले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी बहुतेक कामगार ट्रकमध्येच होते. त्यात 30 मजूर होते. या ट्रकमध्ये चुन्याची पोती भरलेली होती. झोपेमुळे बरेच कामगार मरण पावले. घटनेनंतर समोर आलेल्या चित्रात मजुरांच्या सामानाचा ढीगदेखील दिसतो. राजस्थानहून येणाऱ्या ट्रक चालकाच्या झोपेमुळे हा अपघात झाला. धडक लागून दोन्ही ट्रक पलटी झाले.