नवी दिल्ली, 16 डिसेंबर: काही दिवसांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना व्हायरस (Corona Virus) पुन्हा एकदा डोकंवर काढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट (New variant) ओमायक्रॉननं (Omicron) संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. ओमायक्रॉन हा कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट आता देशभरात वेगानं पसरत आहे. बुधवारी, महाराष्ट्र (Maharashtra) आणि केरळमध्ये (Kerala) या नवीन प्रकाराचे 4-4 नवीन रुग्ण आढळले, त्यानंतर तामिळनाडूमध्येही (Tamil Nadu) एक प्रकरण नोंदवण्यात आलं. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनची 73 रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 32 रुग्ण आढळले आहेत.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या रिपोर्टनुसार, महाराष्ट्रात आढळलेल्या चार नवीन संसर्गांपैकी 2 रुग्ण उस्मानाबादमधील, 1 मुंबईतील आणि एक बुलढाण्यातील आहे. यापैकी 3 रुग्णांचे लसीकरण करण्यात आले आहे. बाधितांमध्ये 16 ते 67 वयोगटातील एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. सर्व रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. त्याचवेळी राज्यात बुधवारी कोरोनाचे 925 नवे रुग्ण आढळून आले असून 10 जणांचा मृत्यूही झाला आहे.
कोणत्या राज्यात किती रुग्णांची नोंद
राज्य - ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा
महाराष्ट्र - 32
राजस्थान- 17
दिल्ली- 06
गुजरात- 04
कर्नाटक- 03
तेलंगणा- 02
केरळ- 05
आंध्रप्रदेश- 01
चंदीगड- 01
पश्चिम बंगाल- 01
तमिळनाडू- 01
एकूण- 73
राज्यातले चारही रुग्ण आयसोलेट
प्राथमिक माहितीनुसार, उस्मानाबाद येथील बाधित हा शारजाहून आला असून दुसरा रुग्ण त्याच्या संपर्कातील आहे. याशिवाय बुलढाण्यातील वृद्ध व्यक्ती दुबईच्या ट्रिपवरून परतले होते आणि दुसरा रुग्ण मुंबईहून आयर्लंडला गेला होता. या सर्वांना रुग्णालयात अलग ठेवण्यात आले आहे. तसेच या रुग्णांच्या जवळच्या संपर्काचा शोध घेतला जात आहे.
929 रुग्णांना डिस्चार्ज
महाराष्ट्रात बुधवारी 929 कोरोना बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 6,467 रुग्ण सक्रिय आहेत. तसेच राज्यातील रिकव्हरी दर 97.72% आहे. ताज्या अपडेटनुसार, 24 तासांत कोविड-19 मुळे 10 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 2.12% आहे. सध्या 75,868 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत आणि 864 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus