नवी दिल्ली, 20 जून : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये वाद सुरू आहे. अशात गलवान खोऱ्यात झालेल्या हल्ल्यानंतर चीन आता भारतावर आणखी एक हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. दोन्ही देशांमधल्या या वादाचा फायदा घेत चीनमधल्या हॅकर्सने भारतातील महत्त्वाच्या केंद्रावर सायबर हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स एका ईमेलचा वापर करत असल्याचंही समोर आलं आहे. एबीपी न्यूजमध्ये प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, 21 जूनला चीन भारतावर सायबर हल्ला करू शकतं. यासाठी चीनच्या हॅकर्सनी 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा प्लान केला आहे. यामध्ये एक ईमेल आयडीदेखील समोर आला आहे. त्यांसंबंधी काही महत्त्वाच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत.
CERT-In issued advisory on COVID 19-related Phishing Attack Campaign by Malicious Actors. pic.twitter.com/x8WO3TseCM
— CERT-In (@IndianCERT) June 20, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, चीनी हॅकर्स एका ईमेलच्या माध्यमातून भारतावर सायबर हल्ला करणार आहे. यामध्ये अनेक भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती आहे. चीनने भारतील रेल्वे आणि बँकिंग सिस्टम हॅक करण्यास सुरूवात केली असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यासाठी भारतानेही सायबर सुरक्षा वाढवली आहे. दरम्यान, ’ncov2019.gov.in’ या ईमेल आयडीने जर तुम्हाला कोणताही मेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करू नका किंवा कोणताही रिप्लाय या मेलवर देऊ नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याविषयी अधिक सांगायचं तर मोफत कोव्हिड-19 चाचणी संदर्भात हा मेल येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा धोक्यापासून सुरक्षित राहा असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत ऑस्ट्रेलियामध्ये अनेक सायबर हल्ले झाले आहे. या हल्ल्यामागे चीनचा हात असल्याचा संशय आहे. ऑस्ट्रेलियाने कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी अनेकदा चौकशी करण्यास सांगितलं असता असं हल्ले अधिक तीव्र झाले असल्याचं समोर आलं आहे. ‘वारंवार होणाऱ्या सायबर हल्ल्यांसाठी चीनला जबाबदार धरलं जात आहे. या हल्ल्यामागे चीनचा हात असल्याचा पूर्ण विश्वास आहे’ असं ऑस्ट्रेलियन सरकारच्या तीन सूत्रांनी शुक्रवारी सांगितलं. संपादन - रेणुका धायबर