मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /Serial Killer : 400 पेक्षा जास्त मुलांचा जीव घेणारी क्रूरकर्मा स्त्री! का केली हत्या जाणून घ्या

Serial Killer : 400 पेक्षा जास्त मुलांचा जीव घेणारी क्रूरकर्मा स्त्री! का केली हत्या जाणून घ्या

डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, एक बेबी फार्मर असलेल्या अमेलियानं पैशाच्या लालसेपोटी 400 हून अधिक मुलांची निर्घृण हत्या केली होती.

डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, एक बेबी फार्मर असलेल्या अमेलियानं पैशाच्या लालसेपोटी 400 हून अधिक मुलांची निर्घृण हत्या केली होती.

डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, एक बेबी फार्मर असलेल्या अमेलियानं पैशाच्या लालसेपोटी 400 हून अधिक मुलांची निर्घृण हत्या केली होती.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : लहान मुलं अतिशय निरागस असतात. ते आपल्या सहज सुलभ बाललीलांच्या माध्यमातून कुणालाही आपल्याकडे आकर्षित करून घेतात. अशा निरागस बालकांना पाहून कितीही कठोर मनाची व्यक्ती असली तरी तीदेखील आनंदीत होते. मात्र, काही व्यक्ती याला अपवाद असतात. ब्रिटनमधील अमेलिया डायर नावाची महिला या अपवाद असलेल्या व्यक्तींपैकीच एक म्हणावी लागेल. डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, एक बेबी फार्मर असलेल्या अमेलियानं पैशाच्या लालसेपोटी 400 हून अधिक मुलांची निर्घृण हत्या केली होती. ही धक्कादायक घटना 1896 मध्ये उघडकीस आली होती. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

बेबी फार्मिंग म्हणजे काय?

18 व्या शतकातील सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये ब्रिटनमध्ये बेबी फार्मिंग ही संकल्पना फार लोकप्रिय झाली होती. त्या काळात ब्रिटनमधील काही लोक पैसे देऊन आपल्या मुलांना बेबी फार्मर्सकडे सोडत असत. यातील काही बेबी फार्मर्स, अल्प कालावधीसाठीच मुलांचा सांभाळ करत असतं. ठराविक वेळेनंतर बालकांना पुन्हा नातेवाईकांच्या ताब्यात दिलं जाई. पण, काही फार्मर्स असे होते जे पालकांकडून पैसे घेऊन मुलांना कायमस्वरूपी आपल्याकडेच ठेवायचे. ज्यांना स्वतःची मुलं होत नाहीत अशांना ही मुलं विकली जायची. एकप्रकारे हा लहान मुलांचा व्यापारच होता.

कसे उघकीस आले बालकांचे खून?

4 एप्रिल 1896 रोजी थेम्स नदीत मासेमारी करताना एका मच्छिमाराला एका पाकिटात गुंडाळलेल्या अवस्थेत लहान मुलीचा मृतदेह सापडला. या मुलीचं वय एक वर्षापेक्षाही कमी होतं. तिच्या गळ्यात एक पांढरी टेप गुंडाळलेली होती. याच टेपनं मुलीचा गळा आवळून खून केला गेला होता. मृतदेहासोबत एक कागदही होता, ज्यावर एका घराचा पत्ता लिहिलेला होता. मच्छिमारानं तातडीनं याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि त्या कागदावर लिहिलेल्या पत्त्यावर पोहोचले.

अमेलिया डायर नावाच्या महिलेचा हा पत्ता होता. पोलीस अमेलियाच्या घरात शिरताच त्यांना मानवी मांसाचा वास आला. पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्यांना बालकांच्या लसीकरणाची अनेक कागदपत्रं आणि कपडे सापडले. यासोबतच त्यांना काही वृत्तपत्रे सापडली, ज्यात या महिलेनं मिसेस हार्बिंग आणि मिसेस स्मिथ या नावांसह अनेक विविध नावांनी बेबी फार्मिंगच्या जाहिराती दिल्या होता. थेम्स नदीत सापडलेल्या मुलीच्या गळ्याभोवती जो टेप आणि कागद आढळला होता तसाच टेप आणि कागद अमेलियाच्या घरात होता.

थेम्स नदीत सापडले अनेक बालकांचे मृतदेह

पुरावे मिळताच पोलिसांनी ड्रॅगिंग ऑपरेशन सुरू केले. त्या ड्रॅगिंग ऑपरेशन दरम्यान, पोलिसांना नदीतून आणखी बालकांचे मृतदेह सापडले. मृतदेहांची संख्या 50 वर पोहोचली तेव्हा पोलिसांनी अमेलियाला विचारलं, ही बालकं कोण आहेत? अशा प्रकारे किती बालकांना मारलं आहे? त्यावर अमेलियानं निर्दयीपणे सांगितलं की, प्रत्येक मुलाच्या गळ्याजवळ लावलेल्या टेपमध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे. ती बालकांच्या तोंडाला टेप लावायची. त्यानंतर गळ्यालादेखील टेप लावून त्यांचा गळा आवळून खून करायची. मात्र, तिनं अशा प्रकारे किती बालकांना मारलं, याबाबत सुरुवातीला तिनं माहिती दिली नाही.

24व्या वर्षी केलं होतं 59वर्षांच्या व्यक्तीशी लग्न

अमेलियानं बालकांना का मारलं? अशा प्रश्न पोलिसांसमोर होता. कसून चौकशी केल्यानंतर तिनं आपली कहाणी पोलिसांना सांगायला सुरुवात केली. तिनं सांगितलं की, तिचा जन्म 1837 मध्ये झाला होता. पाच भावंडांमध्ये ती सर्वात लहान होती. त्यांची आईच सर्व मुलांचा सांभाळ करत होती. पण, आईची मानसिक स्थिती चांगली नसल्यानं अमेलियाचं बालपण चांगलं गेलं नाही. 1848 मध्ये तिची आई मरण पावली. यानंतर ती ब्रिस्टलमध्ये आपल्या मावशीसोबत राहू लागली. 1861 मध्ये, 24 वर्षांची झाल्यानंतर तिनं जॉर्ज थॉमस नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं. जॉर्ज त्यावेळी 59 वर्षांचा होता. मात्र, मॅरेज सर्टिफिकेटवर दोघांनीही आपलं खोटं वय लिहिलं होतं. जॉर्जनं त्याचं वय 48 तर अमेलियाने तिचं वय 30 लिहिलं होतं.

मुलीचा जन्म आणि पतीचा लवकर मृत्यू

लग्नानंतर अमेलियानं नर्सिंगचं प्रशिक्षण घेतलं. लवकरच तिला नोकरीही मिळाली. त्यानंतर अमेलियानं एका मुलीला जन्म दिला. एलेन थॉमस असं नाव असलेल्या आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी तिला वेळ मिळत नसे. त्यामुळे तिनं नर्सिंगची नोकरी सोडली. सर्व सुरळीत असताना 1869 मध्ये अमेलियाचा पती जॉर्ज थॉमस मरण पावला. यानंतर अमेलियाला पैशांची कमतरता जाणवू लागली. पैशासाठी तिनं बेबी फार्मिंग सुरू केलं. ती पैसे घेऊन काही काळ बालकांचा सांभाळ करायची आणि ठराविक कालावधीनंतर नातेवाईकांना परत करायची.

उपासमारीनं बालकांचे मृत्यू

त्यानंतर 1872 मध्ये तिने ब्रिस्टल येथील मद्यनिर्मिती कामगार विल्यम डायरशी लग्नं केलं. या लग्नानंतर तिला एक मुलगी (मेरी अॅन) आणि एक मुलगा (विल्यम सॅम्युअल) झाला. काही काळानंतर तिनं विल्यम डायरलाही घटस्फोट दिला. त्यामुळे तिला बेबी फार्मिंगच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांतून तीन मुलांचं संगोपन करायचं होतं. तिनं आपल्याकडे काळजी घेण्यासाठी सोडलेल्या मुलांच्या आरोग्याशी खेळायला सुरुवात केली. ती त्यांना जेवण देत नसे. त्यामुळे बालकं उपासमारीनं मरण पावली. काही काळ तिचं हे काम सुरळीत सुरू होतं. मात्र, एका बालकाच्या मृत्यूनंतर पालकांनी तपास केला असता अमेलियाच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले तेव्हा अमेलियाच्या निष्काळजीपणामुळे अशाच प्रकारे अनेक बालकांचा बळी गेल्याचं तपासात उघड झालं.

पुराव्यांअभावी सहा महिन्यात सुटका

1879 मध्ये पोलिसांनी अमेलियाला अटक केली. मात्र, तिच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने सहा महिन्यांनी तिची सुटका झाली. तिच्या लक्षात आलं होतं की, काही काळ मुलांना सांभाळण्यासाठी ठेवलं तर ती मुलांना मारू शकत नाही. त्यामुळे तिनं वर्तमानपत्रात वेगवेगळ्या नावांनी जाहिराती द्यायला सुरुवात केली. ज्यामध्ये तिनं तात्पुरती काळजी घेण्याऐवजी मुलं कायमची विकत घेण्याबद्दल माहिती दिली होती.

बालकांना मारून नदीत फेकायची

नावाच्या फरकामुळे लोकांनी पैसे देऊन अमेलियाकडं मुलं सोपवली. अमेलिया एकतर आपल्या मुलांची कायमची काळजी घेईल किंवा मुलबाळ नसेलल्या एखाद्या जोडप्याकडे सुपूर्द करील, असं पालकांना वाटत असे. अमेलिया आपल्या मुलांचा जीव घेणार आहे, याबाबत त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. बालक ताब्यात आल्यानंतर अवघ्या काही तासातच अमेलियाला त्याला मारायची आणि मृतदेह नदीत फेकायची. काही बालकांना तिनं पुरूनही टाकलं होतं.

10 जून 1896 रोजी मिळाली फाशी

अमेलियाचं म्हणणं ऐकून पोलीसही चक्रावले होते. तिनं सांगितलं की, किती मुलांना मारलं हे तिला आठवतही नाही. डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, अमेलियानं 400 हून अधिक बालकांची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी लावला होता. पोलिसांनी अमेलियाला न्यायालयात हजर केलं. यावेळी पुरेसे पुरावे असल्यानं कोर्टाने अमेलियाला फाशीची शिक्षा सुनावली. 10 जून 1896 रोजी तिला फाशी देण्यात आली.

First published:
top videos

    Tags: Baby died, Death