जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / अपघातानंतर सायकल रायडरच्या एका निर्णयाने पलटली बाजी! पराक्रमानंतर Super Mom चं होतंय कौतुक

अपघातानंतर सायकल रायडरच्या एका निर्णयाने पलटली बाजी! पराक्रमानंतर Super Mom चं होतंय कौतुक

अपघातानंतर सायकल रायडरच्या एका निर्णयाने पलटली बाजी! पराक्रमानंतर Super Mom चं होतंय कौतुक

बीआरएम बायसिकल राईड ही अनेकांसाठी स्वप्न आहे. यासाठी लोक वर्षभर मेहनत करतात. मी कमी वेळात या राईडचे 200km, 300km आणि 400km चा टप्पा पूर्ण केला होता. आता शेवटचा 600 किमीची राईड पूर्ण केली की स्वप्न पूर्ण होणार होतं. मात्र,..

  • -MIN READ
  • Last Updated :

माझ्या ध्येयाच्या दिशेने कूच करताना एक-एक पॅडल मारत सायकलीसोबत वेग पकडला होता. पण, अचानक काय झालं काहीच कळलं नाही. मी सायकलीवरुन कोसळले, माझ्या गालाला जबर खरचटलं, उजव्या हाताल मुका मार लागला. काही क्षण डोळ्याला अंधाऱ्या आल्या. अशा परिस्थिती मी उठले, बघते तर काय.. जे व्हायला नको होतं तेच घडलं! प्रवास… प्रत्येक प्राणीमित्राच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. कुणाचा जगण्यासाठी तर कुणाचा फिरण्यासाठी. कुणी धोपट मार्गावरुन पळतोय तर कुणी नवीन वाटा तुडवतोय. अशाच काही साहसी विरांचे Adventure on Wheels आम्ही घेऊन येतोय. या मालिकेतील पुढचा भाग. मी श्वेता कुदे एक सिंपल हाऊस वाइफ आणि दोन मुलांची आई. सोशल होण्यासाठी आणि स्वतःला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी मी काही ना काही फिजिकल ॲक्टिविटीमध्ये भाग घेत राहायचे, काही ना काही उपक्रम करत असायची. व्यायामाची आवड असल्यामुळे जिम मध्ये जाण्याची सवय लागली होती. एरोबिक्स, झुम्बा अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये मन रमायला लागलं होतं. अशातच माझा उत्साह बघून नवर्‍याने पण जिम जॉईन केली. आणि cardio workout साठी तो एक बायसिकल घरी घेऊन आला. पहिल्यांदाच Gear ची Bicycle बघत होते, आत्तापर्यंत फक्त ‘जो जीता, वही सिकंदर’ मधली आमिर खानची Gear ची बायसिकल माहीत होती. जरी ती बायसिकल त्याने त्याच्यासाठी घेतली असली, तरी त्या सायकलीचे माझ्यावर जरा जास्तच प्रेम होतं. vice-versa म्हटलं तरीही चालेल. अन् सायकल जवळची वाटू लागली मार्च 2020 लागला होता आणि अचानक सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं. नंतर ते वाढत जाऊन वर्षभरावर कधी गेलं काही कळलंच नाही. माझ्यासारख्या Gymholic व्यक्तीला जिम बंद म्हणजे एखादी आवडती सवय मोडायला लावण्यासारखेच होते. मी 2020-21 वर्षभर physical Exercise फ्रॉम होमसाठी यूट्यूबचे सगळे वर्कआउट चॅनेल खंगाळून झाल्यानंतर, माझी नजर गॅलरी मध्ये दोन वर्ष उभी असलेल्या सायकलीवर पडली. 2021 मध्ये लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यावर रोज सकाळी सायकलिंग करायला सुरुवात केली. एक वर्ष घरात बसून वैताग आला होता, त्यामुळे जिमपेक्षा सायकलींग राईड छान वाटायचं. 20 ते 25 किमी सायकल चालून आल्यावर स्वतःमध्ये आणि त्यामुळे घरात एक वेगळीच पॉझिटिव्हिटी जाणवायची. अशाच प्रकारे मला समजले की वर्क फ्रॉम होम झाल्यापासून खूप सारे सायकलिंग ग्रुप पुण्यात सुरू झाले होते. मी ते जॉईन करायचं ठरवलं. मग काय मी मस्त सायकलींचे ग्रुप जॉईन केले आणि आमच्या ग्रुप राईड  सुरू झाल्या. पहिले 50 किमी. मग सेंचुरी लोणावळा राईड , लोणावळा सायकल राईड केल्यावर मला कळले की, पुण्यातील लोक मिसळ पावसाठी पाव आणायला जरी टू व्हिलर घेऊन जात असेल तरी रविवारी अर्धे पुणे लोणावळ्याला सायकलवर येऊन मजा लुटत होते. ध्येय बीआरएम बायसिकल राईडचं अशातच मला BRM BICYCLE RIDES बद्दल कळाले. त्यासाठी रायडर्स वर्षानुवर्षे मेहनत करतात. BRM 200km, 300km, 400km आणि 600km. ह्या चार Rides वर्षभरात केल्या की तुम्हाला SUPER RANDENNEUR चे मेडल पॅरिस वरून येतं. मग पहिले 200km. चा विडा उचलला आणि ती कम्प्लीट केल्यावर नवऱ्याने स्वतःहून 300km BRM चे रजिस्ट्रेशन केलं आणि ती पण मी छान वेळेत कंप्लिट केली आणि बघता बघता एका महिन्यात माझ्या 200 किमी, 300 किमी आणि 400 किमी बीआरएम  राईड  यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यात. ज्याच्यासाठी चांगले दिग्गज रायडर्स वर्षानुवर्षे मेहनत घेतात. त्या राईड्स एक साधी हाउसवाइफ महिन्याभरात कम्प्लीट करून मोकळी होते. माझं सगळीकडं कौतुक होत होतं. माझा कॉन्फिडन्स एकदम पिक पॉईंट वर पोहोचला होता. आता वेळ होती 600 किमी. बीआरएम बायसिकल राईडची. परिस्थिती अचनाक इतकी बदलेले याचा विचारही केला नव्हता 18 डिसेंबर 2021 ला सकाळी सहा वाजता वाकडवरून फ्लॅग ऑफ होता. पुणे तुळजापूर पुणे चाळीस तासात नॉन स्टॉप सायकल चालवत दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजता पुण्यात पोहोचायचे होते. सगळं काही खूप छान सेट झाले होते. रात्री सोबत राहणारे रायडर्स, ब्रेक एक्झॅक्टली कुठे घ्यायचं आणि कसे घ्यायचे, सायकल कितीच्या स्पीडने चालवायची सगळं डोक्यात फिक्स प्लॅनिंग होतं. पण, कधीकधी अशा घटना घडतात, ज्यापुढे तुमचं काहीच चालत नाही. सकाळी सकाळी सहा वाजता माझी अगदी उत्साहात माझी 600 किमीची राइच सुरू झाली. स्पीड पण छान होता. 21 किमी ताशी वेगाने साडेसात आठ वाजता थेऊर फाटा गाठला आणि अचानक एक घटना घडली. माझ्यासारखी सारखी प्रो रायडर जिने सायकल वर कितीतरी घाट पालथे घातले होते, ती थेऊरच्या सरळ रस्त्यावर सायकल चालवत असताना सायकलीवरून कोसळते? दोन मिनिट काही कळलेच नाही काय झालं, कारण की अवघ्या आयुष्यात मी पहिल्यांदा सायकलवरून पडले होते. ते पण माझ्या सगळ्यात महत्त्वाच्या SR राईडला. मी लगेच उठले आणि बघितले तर माझ्या उजव्या हाताला आणि गालाला चांगलाच मार लागला होता. एका घटनेने माझ्यासमोर आव्हानाची मालिकच उभी केली मी मनात म्हटलं असू दे.. अंगावरची माती झटकत सायकल उचलली. माझ्यापेक्षा सायकलची झालेली अवस्था पाहून मला मोठा धक्का बसला. माझ्या रोड बाईक सायकलचे दोन्ही गिअर शिफ्टर तुटले होते. त्या क्षणाला स्वतःला लागल्याचा त्रास तितका जाणवत नव्हता जेव्हढे वाईट सायकल ब्रेक डाऊनचे वाटत होते. डोळ्यातून पाणी वाहत होते. ही महत्वाची राईड कशी पूर्ण करायची? मला राईड  मधेच सोडायची नव्हती. लगेच मागचे रायडर्स माझी विचारपूस करायला आले, ते मला म्हणत होते की मॅडम 550 किलोमीटर पूर्ण रात्रभर सायकल तुम्ही इतक्या लागलेल्या अवस्थेत नाही चालवू शकणार, तुम्ही ही राईड स्किप करा. पण माहित नाही का, त्यावेळेस माझ्यातला रायडर मला ते करू देत नव्हता. तेव्हा मला माझ्या लागलेल्या सुजलेल्या उजव्या हाताची काळजी नव्हतीच, त्या तुटलेल्या सायकलने राईड  कशी करू हा मोठा प्रश्न होता. मी लगेच ऑर्गनायझरला फोन केला की मला सायकल रिप्लेसमेंट भेटेल का? त्याचवेळी घरी नवर्‍यालाही फोन केला, नवरा बिचारा लगेच मला भेटायला निघाला. माझ्यासाठी दुसरी सायकल आली. पण, त्याच्यात दोन तास गेले. त्यात ह्या सायकलचं वजन माझ्या आधीच्या सायकलपेक्षा 6 किलो जास्त होतं. जेव्हा तुम्ही मोठ्या अंतराची सायकल राईड  करता, त्यातही 600 किमी सारखे अंतर असेल तर सायकलचं वजन खूप महत्त्वाचं ठरतं. आता माझ्यापुढे दोनतीन आव्हानं होती. माझ्या गालाला जबरदस्त खरचटले होते, उजव्या हाताला मुका मार होता, इतका की तो हात मला सहज हलवतात येत नव्हता, त्यासाठी दुसर्‍या हाताची मदत लागत होती. आता अशा अवस्थेत मला 550 कमी सायकल चालवायची होती. रस्त्यात थांबून मी फक्त चार पेन किलर आणि एक MOOV चा स्प्रे विकत घेतला आणि पुन्हा सायकलींग सुरू केले. मध्यरात्री 11 ते दोनच्या दरम्यान सायकल राईडींगचा थरार सूर्य डोक्यावर आला होता. ऊन तापायला लागलेलं, पुण्याहून इंदापूरला पोचायला मला संध्याकाळचे पाच वाजले. तिथे थोडं खाल्ल आणि सोलापूर हायवे वरून तुळजापूरला निघाले. त्यावेळी एका रायडरला रात्री माझ्या स्पीडने आणि माझ्यासोबतच राईड  करा अशी विनंती केली होती. इंदापूर ते सोलापूर 110 किमी पूर्ण करायला मला रात्रीचे दहा वाजले. अशात पेन किलरने मला खूप झोप येत होती. पण मागून वारा असल्याने जरा स्पीड भेटली होती, सोलापूरला रात्री दहा वाजता जेवण केल्यावर आणि मी आणि माझा कॉ-रायडर तुळजापुरला निघालो. माझ्या उजव्या गालावर उजव्या डोळ्याच्या खालीच लागल्यामुळे मला उजव्या डोळ्याने अंधुक दिसायला लागलं होतं. माझा गॉगल तुटला होता आणि दुसरा गॉगल घ्यायला मी थांबली नव्हती, त्यामुळे मला रात्री उजव्या डोळ्याला वार लागून त्या डोळ्याला त्रास जाणवत होता. (असे तर नवऱ्यासोबत रोड ट्रिप करताना रात्रीच्यावेळी गाडीच्या खाली पण न उतरणारी मी, आज सोलापूर ते तुळजापूर रस्त्यावर फक्त एका रायडरच्या सोबतीने सायकल चालवत होते. ते पण रात्री अकरा ते दोनच्या मधे. माहित नाही ही हिंमत माझ्यात कुठून आली होती). पेन किलर घेतल्यानंतरही आता लागल्याचा परिणाम स्पष्ट जाणवत होता तुळजापूरचा चेक पॉइंट हा 2.45am ला बंद होणार होता आणि मी 2.35am ला तुळजापूर मंदिराचा शेवटचा घाट चढत होते तरी मी रात्री 2.40am ला तुळजापूरच्या चेक पॉइंटला पोहोचले, त्यावेळेस बाकी सगळे रायडर्स त्यांची रेस्ट संपवून परत राईड  सुरु करण्याच्या गडबडीत होते. खरंतर 600 किमी अंतर पूर्ण करण्यासाठी कोणताही अनुभवी रायडर असला तरी त्याला कमीत कमी तीन तास तरी झोप भेटते. पण, माझ्याकडे तोही वेळ नव्हता, मी फक्त तीस मिनिट ब्रेक घेतला आणि पुन्हा रिटर्न राईड  सुरू केली. आता मला 300 किमी सायकल चालवत पुण्यात पोहोचायचं होतं. पेन किलर घेतली असली तरी लागल्याचा परिणाम जाणवायला लागला होता. शरीर थकलं होतं. तरीही जोमाने बाकीच्या रायडर्स सोबत मी स्पीड मॅच करून सकाळी साडेसात वाजता सोलापूर गाठलं. पण जड सायकल आणि थकलेलं शरीर यामुळे मला सोलापूर ते इंदापूर पोहचायला दुपारचे 2 वाजले. जसा इंदापूरचा चेक पॉईंट गाठला तिथे बाकी सगळे रायडर जेवण करून निवांत निघण्याच्या तयारीत होते. पण मला तो इंदापूरचा चेक पॉईंटला पोहोचण्याचा प्रचंड आनंद होत होता. आता फक्त शेवटचे 150 किमी सायकल चालवायची आहे, त्यामुळे एक वेगळीच शक्ती अंगात संचारली होती, असं म्हणायलाही हरकत नाही. त्या पॉईंटला पोहोचण्याचा आनंद मला शब्दत सांगता येणं कठीणच आहे. उत्साहात आणि जोमात पुन्हा इंदापूर ते पुणे राईड अर्ध्या तासाच्या रेस्ट नंतर सुरू केली. अशाप्रकारे मी दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊला पुण्यात वाकड येथे माझे शेवटचे चेक पॉईंट गाठलं. नंतर दोन महिने सायकलला हातही लावला नाही मी राईड कम्प्लीट करून जेव्हा सायकल हातातून सोडली, तेव्हा मला जाणवायला लागलं की मला जरा जास्तच लागलेलं आहे. मी जेव्हा नवऱ्याच्या गाडीत जाऊन बसले आणि आरशात स्वतःला बघितलं तेव्हा मी स्वतःला बघून घाबरले, माझा चेहरा उजव्या बाजुला चांगलाच सुजला होता. खरचटल्यामुळे जखमा पण होत्या. सायकलिंग थांबवल्यावर माझा हात फणफण करायला लागला होता. घरी येईपर्यंत पण मला गाडीत बसवत नव्हतं. नंतर महिनाभर मला टू व्हीलर सुद्धा चालवता आली नाही आणि दोन महिने सायकल. इतकी माझ्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. अशाप्रकारे माझ्यासारख्या सिंपल  हाऊस वाइफने त्यादिवशी एक Extraordinary सायकल राईड केली होती. ती 18 डिसेंबर पौर्णिमेची रात्र मला नेहमी अविस्मरणीय राहील. त्या दिवसापासुन माझी सायकल ही नेहमीकरता माझी हिम्मत वाढवणारी सखी झाली होती. - श्वेता कुदे, सायकल रायडर, पुणे तुमचाही असाच साहसी प्रवास असेल तर आमच्याशी Rahul.Punde@nw18.com या मेल आयडीवर नक्की संपर्क साधा. आम्ही तुमच्याही अनुभवांना जगापर्यंत पोहोचवू.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात