प्रविण मुधोळकर, प्रतिनिधी यवतमाळ, 06 नोव्हेंबर : अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झालाच नाही तर तिली थेट गोळ्या घातल्या याचे पुरावे न्युज 18 लोकमतच्या हाती लागले आहे. अवनीला गोळ्या घातल्यानंतर दोन वनाधिकार्यामध्ये झालेल्या फोनवरील संभाषणातून अवनीला आधी गोळ्या घातल्या गेल्या आणि नंतर बेशुद्ध करण्याच डार्ट तिच्या मृतदेहावर लावल्याचही पुढे येत आहे. या ऑडियो क्लिपमध्ये वेटरनरी डॉक्टर्सच्या हवाल्याने वनाधिकारी ही माहिती एकमेकांना देत आहेत. वनविभागाकडून अवनी वाघिणीने वनविभागाच्या बचाव पथकावर हल्ला केल्याने तिला गोळ्या घातल्याचं सांगितलं जात होतं. यवतमाळच्या राळेगावच्या जंगलात अवनी टीवन वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने गोळ्या घातल्या होत्या. हे संभाषण फॉरेस्ट अधिकाऱ्यामध्ये झालं आहे. यात स्पष्टपणे वाघिणीला थेट गोळ्या घातल्याचं हे अधिकारी सांगताहेत. या अधिकाऱ्यांनी केलेलं संभाषण… अधिकारी 1 - वाघीण जशी आली, तसे लाईट लावले आणि तिला मारून टाकलं अधिकारी 2 - बेशुद्धीचं इंजेक्शन मारलं नाही का अधिकारी 1 - नाही. पण पोस्ट मॉर्टममध्ये तसंच येईल. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावच्या जंगल परिसरात 13 लोकांचा जीव घेणाऱ्या टी-1 अर्थात अवनी या नरभक्षक वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू टीमनं ठार केलं. पण, अवनीला ठार मारणं म्हणजे थंड डोक्यानं योजनबद्धरीत्या तिचा केलेला खून आहे असा थेट आरोप वन्यजीवप्रेमींनी केला आहे. वनविभागाने या ऑपरेशनबद्दल अजिबात पारदर्शकता ठेवली नाही. कोट्यवधी रुपये वाया गेले असाही आरोप वन्यप्रेमींनी केला आहे. तर शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच यातील उणीवा सर्वांसमोर येतील. पण या मोहिमेसंदर्भातली सर्व माहिती पुढे यावी यासाठी फॉरेंसिक अहवालसु्द्धा मागवावा, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे. दरम्यान, अवनी तर गेली आता तिच्या दोन बछड्यांचं काय होणार असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. मानव आणि वन्यजीव संघर्षातून वाघिणील जीव गमवाला लागला असल्याचं वन्यजीव प्रेमींनी म्हटलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







