नदी दिल्ली , 28 ऑक्टोबर: प्रेम पैशाच्या तराजूत तोलता येत नाही असं म्हणतात, हेच जपानच्या राजकुमारीनं सिद्ध करुन दाखवल आहे. सत्ता, राजेशाहीवर पाणी सोडत जपानची राजकुमारी माकोनं (japan princess mako) तिच्या कॉलेज प्रियकराशी लग्न केले आहे. इतकेच नव्हे तर तिने आपल्या पतीसोबत वन-बीएचकेमध्ये राहण्याची पसंती दर्शवली आहे. राजकुमारीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुकही होत आहे. 30 वर्षीय राजकुमारी माको ही, जपानचे क्राउन प्रिंस फुमिहितो यांची सर्वात मोठी मुलगी आहे. माकोनं आठ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आपल्या प्रियकरासोबत लग्न केलं. मंगळवारी (26 ऑक्टोबर 2021) राजकुमारी माको आणि तिचा प्रियकर केयी कोमुरो (Kei Komuro) यांचा विवाहसोहळा अत्यंत साध्या पद्धतीनं पार पडला. जपानच्या राजघराण्यातील एखाद्या मुलीला जर सामान्य कुटुंबातील मुलाशी लग्न करायचं असेल तर तिला रॉयल टायटल (Royal Title) सोडावं लागतं. या नियमानुसार, राजकुमारी माकोनं आपल्या रॉयल टायटलचा त्याग करून सामान्य कुटुंबातील केयी कोमुरोशी लग्न केलं. जपानी मीडिया एनएचकेनं (NHK) दिलेल्या वृत्तानुसार, माकोचे पती व्यवसायानं वकील असून ते अमेरिकेतील एका लॉ फर्ममध्ये नोकरी करतात. त्यामुळे राजकुमारी अमेरिकेला जाणार आहे. राजकुमारी माकोनं लग्नापूर्वीचं टोकियोमध्ये असलेला शाही बंगला सोडला आहे. सध्या माको आणि कोमुरो दोघेही टोकियोतील एका अपार्टमेंटमध्ये राहण्याचा विचार करत आहेत. त्यानंतर दोघं अमेरिकेला जातील. तिथे न्यूयॉर्क सिटीमध्ये असलेल्या एक बेडरूम असलेल्या फ्लॅटमध्ये हे नवविवाहित दाम्पत्य राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. न्यूयॉर्क शहरातील काही खास भागात (जसं की मॅनहॅटनमधील वेस्ट मिल) एका बेडरूमच्या फ्लॅटचं भाडं 2.2 लाख ते 8.2 लाख रुपये प्रति महिना आहे. राजकुमारी माकोनं वकील असलेल्या केयी कोमुरो यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जपानमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. त्यांच्या लग्नाला मोठ्या प्रमाणात विरोधदेखील झाला. मात्र, मोको आपल्या निर्णयावर ठाम राहिली आणि तिने लग्न केलं. लोकांचा विरोध लक्षात घेता एका बंद खोलीमध्ये अगदी साध्या पद्धतीन लग्न सोहळा पार पडला. विरोध जरी असला तरी राजघराण्यातील सदस्यांनी या लग्नाला हजेरी लावली होती. लग्नानंतर या जोडप्यानं पत्रकार परिषद घेऊन या लग्नामुळं काही लोकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली होती.विशेष म्हणजे राजकुमारीनं आपलं रॉयल टायटलचा त्याग तर केलंच शिवाय त्यानंतर मिळणारी 9 कोटी रुपयांची रक्कम देखील नाकारली आहे. जपानच्या राजघराण्याशी संबंधित असलेल्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजघराण्याचा त्याग केल्यानंतर माकोला सुमारे 9 कोटी रुपये मिळाले असते. परंतु, राजकुमारीने हे पैसे घेण्यास नकार दिला. आपल्या पतीसोबत अमेरिकेला जाण्यासाठी राजकुमारीला पासपोर्ट आणि व्हिसासाठी अर्ज द्यावा लागणार आहे. अमेरिकेत गेल्यानंतर माको त्या ठिकाणी नोकरीदेखील करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गोष्टी आणि चित्रपटांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या राजकुमारींच्या प्रतिमेला झुगारून स्वतंत्र आयुष्य जगण्याचा निर्णय राजकुमारी माकोनं घेतला आहे. प्रेमासाठी संपत्तीचा त्याग करणाऱ्या या जपानी राजकुमारीचं जगभरात कौतुक होत आहे. माको आणि तिचा 30 वर्षीय प्रियकर कोमूरोने 2017 साली आपल्या साखपुड्याची घोषणा केली. त्यानंतर राजकुमारीच्या प्रियकराचा परिवार आर्थिक संकटाशी सामना करत असल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर कोमुरो कायद्याचे पुढील शिक्षण घेण्यासाठी 2018 साली अमेरिकेला गेले. सध्या कोमुरो एका लॉ फर्ममध्ये काम करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.