वाराणसी, 11 मे :देशात कोरोनामुळे (Coronavirus in India) परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. अशा स्थितीत प्रत्येक जण आपपल्या परीने मदत करीत आहे. सामान्य माणूसही या भयंकर परिस्थितीत खचून न जाता काही असामान्य काम करून जातो. त्यातलेच एक अन्वर हुसैन. दीड वर्षांच्या मुलीनं त्यांच्या मांडीवर रुग्णवाहिकेतच प्राण सोडला. पण या घटनेनं कोसळून गेलेल्या पित्याने काही दिवसातच सावरत अनेकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. गरजू लोकांना निःशुल्क रुग्णवाहिका,ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा करतात. अन्वर हुसैन यांच्या असामान्य धैर्याची आणि माणुसकीची गोष्ट दैनिक भास्करने प्रसिद्ध केली आहे.
वाराणसीतील अशोक बिहारी कॉलनीत राहणारे आणि इंटेरिअरचा व्यवसाय असणारे हुसैन यांच्याबाबत नुकतीच एक दुःखद घटना घटली. हुसैन यांच्या दीड वर्षाच्या मुलीचा त्यांच्या मांडीवर रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला.पण आता सध्या ते गरजू लोकांना निशुल्क रुग्णवाहिका,ऑक्सिजन आणि औषधांचा पुरवठा करतात. कुटुंबातील सदस्यांची वाट पाहत असताना सर्वसामान्य कारणाने मृत्यू झालेल्यांचे शव खराब होऊ नये यासाठी अनवर यांनी 90 हजार रुपये खर्चून दोन फ्रिजर (Freezer)मागवले असून ते फ्रिजर अनवर मस्जिद किंवा अन्य धर्मिक स्थळांना दान करणार असल्याचे दैनिक भास्कर च्या वृत्तात म्हटलं आहे.
ज्यांच्या घरी कोणाचा मृत्यू झालाय आणि त्यांचे कुटुंबीय बाहेर गावी आहेत, त्यांच्यासाठी अन्वर मोलाचं काम करतात. सामान्यपणे मृत्यू होणाऱ्यांजवळ लवकर कोणी जात नसल्याचे सातत्याने बघायला मिळत आहे. मृत व्यक्तीचे नातेवाईक बाहेरगावी असतील तर बॉडी खराब होण्याची शक्यता असते. ती खराब होऊ नये यासाठी मी कानपूरवरुन 90 हजार रुपये खर्चून 2 फ्रिजर मागवले आहेत. ते मी कोणत्याही धार्मिक स्थळी ठेवणार आहे. ज्यांना गरज आहे,अशा व्यक्ती नातेवाईक येईपर्यंत त्यात शव ठेवू शकतील, असे अनवर हुसैन यांनी सांगितले.
मुलीचा रुग्णवाहिकेत मृत्यू झाल्याने आला विचार
अन्वर हुसैन म्हणाले,की सप्टेंबर 2019मध्ये माझी एकुलती एक मुलगी मरियम गंभीर आजाराशी लढत होती. वाराणसीतीली रुग्णालयात 20 दिवस ठेवल्यानंतर तिला दिल्लीला घेऊन जाण्यास सांगण्यात आले. रुग्णवाहिकेतून (Ambulance) जाताना रस्त्यात रुग्णवाहिका पंक्चर झाली. नोएडा जवळ गाडीतच माझ्या कुशीत मुलीचा मृत्यू झाला. त्याचवेळी माझ्या मनात विचार आला की कोणाचाही उपचाराविना मृत्यू होऊ नये.
रस्त्यात रुग्णवाहिका पाहताच मी चिडायचो
अन्वर यांनी सांगितले की रस्त्यात कुठेही रुग्णवाहिकेचा हूटर ऐकला की मी चिडून घरी यायचो. तेव्हा रुग्णवाहिका आणि सेवा यांची जोड तु तुझ्या आयुष्याला दे, तेव्हाच मरियमला शांती मिळेल, असा सल्ला माझे मित्र राजेश उपाध्याय यांनी दिला. त्याच दिवशी मी नगरसेवक सत्यम सिंह यांच्याशी रुग्णवाहिकेबाबत चर्चा केली.
'आज मला शांत झोप लागेल', कोरोनामुक्त प्रिया बापटने पहिल्यांदाच केलं मोठं काम
त्यांनी त्यांच्याकडील एक कार तातडीने मला दिली. या कारचे रुपांतर मी रुग्णवाहिकेत केले. गेल्या 25 दिवसांपासून मी सर्व काम सोडून रुग्णवाहिका चालवत आहे. रुग्णांना रुग्णालयात पोहोचवणे,आॅक्सिजन,औषधे पुरवणे या गोष्टी मी निशुल्क उपलब्ध करुन देत आहे. वाराणसी,जौनपूर,गाजीपूरपर्यंत ही सेवा मी सध्या देत आहे.
मित्रांच्या आधारामुळे सेवा करण्याची हिंमत मिळाली
अन्वर यांचे मित्र राजेश उपाध्याय यांनी सांगितले,की अन्वर हे मुलीच्या मृत्यूमुळे कोसळले होते. त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी लोकांची मदत आणि सेवा करणे हा एकमेव पर्याय होता. त्यांचे वडील,पत्नी यांच्या सहकार्यातून रुग्णवाहिका,आॅक्सिजन (Oxygen)आणि औषधांचा मोफत पुरवठा सुरु केला. आज ते समाजासाठी दिशादर्शक ठरले आहेत.
माझे शरीरही बीएचयूला दान करणार
अन्वर म्हणाले की माझ्या मुलीचा मृत्यू गंभीर आजारामुळे झाला. या आजारावर इलाज होणं मुश्किल होतं. त्याच वेळी मी मनाशी खूणगाठ बांधली की मी माझे शरीर बीएचयूमधील (BHU)वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दान करणार. यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी फायदा होईल.
कोरोना संकटात Ola ची मोठी घोषणा; गरजूंना मोफत देणार Oxygen Concentrators
मरियमच्या आठवणी,तिच्या वस्तू,तिच्या पावलांचे ठसे आजही माझ्या खोलीत आहेत.तिचे ड्रेस मी पुतळ्यांप्रमाणे सजवून ठेवले आहेत. 2 फेब्रुवारीला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी 300 पेक्षा अधिक गरीब मुलांना मी खाद्यपदार्थ आणि ड्रेसचं वाटप करतो आणि त्यांच्या सोबत केकही कापतो. मरियमच्या निधनानंतर माझ्या घरी मारीयानं जन्म घेतला असून,ती आता 8 महिन्यांची झाली आहे.
मुलांसाठी हॉस्पिटल उभारण्याचं स्वप्न
मरियम ट्रस्टच्या माध्यमातून लवकरच मुलांसाठी हॉस्पिटल उभारणार आहे. तिथे गरजू मुलांवर मोफत उपचार केले जातील. आजही आजारी मुलांना मदत करण्यासाठी मी तत्परतेने पुढे सरसावतो. मागील लॉकडाऊनमध्ये 72 दिवस 500 लोकांना सातत्याने खाद्यपदार्थांचे वाटप मी केले होते,असे अन्वर यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Inspiration, Inspiring story, Positive story, Varanasi