07 जानेवारी : विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकारणही जोरात रंगू लागलं असून भाजप नेते आणि उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी लोकसंख्यावाढीवरून वादग्रस्त विधान करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे. देशाची लोकसंख्या हिंदूंमुळे नव्हे तर 4 बायका आणि40 मुलं असणाऱ्यांमुळे वाढत आहे, असं विधान मुस्लिम धर्माचा उल्लेख न करता त्यांनी केलं आहे.
काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी या विधानावर जोरदार आक्षेप घेतला आहे. या विधानात धर्माचा उल्लेख करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहितेबरोबरच सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या आदेशाचं उल्लंघनही यामुळे झालं आहे. त्यामुळे याप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असं काँग्रेस सांगितलं आहे.
तर, साक्षी महाराज यांच्या विधानावर भाजपने लगेचच सावध पवित्रा घेतला आहे. याबाबत केंद्रीय अल्पसंख्याक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी प्रतिक्रिया देताना, साक्षी महाराज यांचे हे वैयक्तिक मत आहे. ही पक्षाची भूमिका नाही, असे म्हटले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही याप्रकरणी अहवालही मागवला आहे. या विधानाने आचारसंहितेचा भंग झाला आहे का, याची आयोगाकडून चाचपणी केली जात आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv