21 सप्टेंबर : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी आज 11 हजार 609 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. मुंबई पोलिसांनी किला कोर्टात हे आरोपपत्र दाखल केलंय. या आरोपपत्रात एकूण 22 आरोपींची नावं आहेत. चेन्नई सुपर किंग्जचे माजी सीईओ गुरुनाथ मय्यप्पन, अभिनेता विंदू दारा सिंग आणि पाकिस्तानचे अंपायर असद रौफ यांच्याही नावाचा समावेश आहे. आरोपींवर फसवूणक, सट्टेबाजी आणि षडयंत्र रचल्याचे आरोप ठेवण्यात आलेत. विशेष म्हणजे यात स्पॉट फिक्सिंगचा आरोप नमूद केला गेला नाहीये. मयप्पन आणि विंदू दारासिंग यांच्या दूरध्वनी संभाषण तसंच सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल सीम कार्डच्या आधारे पुरावे गोळा करण्यात आलेत. 22 आरोपींपैकी आज कोर्टात 18 आरोपी हजर होते. या खटल्याची पुढची सुनावणी आता 21 नोव्हेंबरला होणार आहे. या अगोदर दिल्ली पोलिसांनी 30 जुलै 13 रोजी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील याच्यासह 39 जणांवर आरोपपत्र दाखल केलं होतं. या आरोपपत्रात दाऊद सट्ट्याचे रेट ठरवत होता असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. तर राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडू अजित चंडिला, अंकित चव्हाण आणि एस श्रीसंत यांची नावंही या आरोपपत्रात आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात बीसीसीआयने श्रीशांत आणि अंकित चव्हाणवर आजीवन बंदी घातली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.