03 जानेवारी : सावित्रीबाई फुलेंच्या 186व्या जयंतीनिमित्त गुगलने खास डूडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षण आणि महिला सबलीकरण यांच्यासाठी केलेल्या कार्याला मानवंदना म्हणून गुगलने डुडल तयार केलं आहे.
आयुष्यभर स्त्री शिक्षणासाठी अविरतपणे झटणाऱ्या सावित्रीबाईंनी सर्व स्त्रियांना मायेने आपल्या पदराखाली घेतल्याचं डुडल गुगलकडून तयार करण्यात आलं आहे. महिलांचे शिक्षण, त्यांचे सबलीकरण, त्यांचे हक्क यांच्यासाठी सावित्रीबाई आयुष्यभर झटत होत्या.
सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831मध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगांव इथे झाला. महिलांचं शिक्षण आणि त्यांच्या सबलीकरण यासाठी सावित्रीबाई फुले यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. पती जोतीबाराव फुले यांना खंबीरपणे साथ देत आणि प्रसंगी समाजाच्या विरोधात जात सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे सामाजिक कार्य खंबीरपणे सुरू ठेवलं. ज्योतीराव फुलेंच्या मदतीने पुण्यातील भिडे वाड्यात 1848मध्ये सावित्रीबाई फुले यांनी देशातील महिलांसाठीची पहिली शाळा सुरु केली. सामाजिक सुधारणेच्या चळवळीत सावित्रीबाई फुले यांनी मोलाची भूमिका बजावली.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन देशभर आणि जगभरात विवीध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. गुगलनेही डुडल तयार करून सावित्रीबाईंच्या कार्याला अभिवादन केलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv