मुंबई – 11 मे: शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि इंद्राणी मुखजीचा ड्रायव्हर श्यामवर राय याने कोर्टाकडे माफीचा साक्षीदार होण्याची विनंती केली आहे. शीना बोरा हिची हत्या गळा दाबून करण्यात आली होती. त्याबद्दल सगळी माहिती माझ्याकडे आहे आणि ती देण्यास मी तयार आहे, असंही त्याने कोर्टात सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता एक आता नवीनच वळण मिळाले आहे.
शीना बोरा हत्या प्रकरणात श्यामवर राय याच्यासह शीनाची आई इंद्राणी मुखर्जी, इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी, इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना हे सर्वजण आरोपी असून, ते सर्वजण कोठडीत आहेत. श्यामवर राय याने कोर्टात सांगितलं की, शीना बोराची हत्या कुठे झाली, हे सर्व मला माहिती आहे. तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता. त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो. या सगळ्याचा आता मला खूप पश्चाताप होतो आहे. त्यामुळे मी सर्व माहिती सांगण्यास तयार आहे. मला माफीचा साक्षीदार करण्यात यावं, अशी विनंती त्याने कोर्टाकडे केली.
त्यावर कोर्टाने दोन्ही पक्षाचे मत मागवलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 17 मे रोजी होणार आहे. जर तो साक्षीदार झाला, तर सीबीआयचे वकील त्याची साक्ष घेतील, त्यानंतर इंद्राणीचे वकील उलटतपासणी करतील, आणि त्यानंतर माफीचा साक्षीदार म्हणून त्याचा जबाब ग्राह्य धरला जाईल.
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये हे प्रकरण उघडकीस आलं होतं. 19 नोव्हेंबरला मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला अटक केली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv