16 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने (आप) 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून अंजली दमानिया, विजय पांढरे, मेधा पाटकर, मीरा सन्याल आणि मयांक गांधी यांचा समावेश आहे. मेधा पाटकर यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र त्या कोणत्या मतदारासंघातून आणि कोणत्या पक्षाच्या वतीने निवडणुक लढविणार याबद्दल गुप्तता पाळली होती. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचे नाव पहिल्या यादीत नाही. त्यावर आपचे संजयसिंह आणि मनीष सिसोदिया ठोस उत्तर देऊ शकले नाही.
महाराष्ट्रात अंजली दमानिया नागपूरमधून निवडणूक लढविणार आहेत. भाजप माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी नागपूरमधून लोकसभेची निवडणुक लढविण्याची शक्यता आहे. त्याच्या विरोधात ‘आप’ने दमानिया यांना उमेदवारी दिली आहे. भ्रष्टाचाराविरोधात दमानिया महाराष्ट्रात काम करत असल्याचे संजयसिंह यांनी सांगितले.पत्रकार आशुतोष यांना ‘आप’ने दिल्लीतील चांदणी चौक मतदार संघातून रिंगणात उतरविण्याचे ठरविले आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांना आव्हान देण्याची ‘आप’ची तयारी आहे. तर अमेठीमधून राहुल गांधी यांच्याविरोधात कुमार विश्वास निवडणूक लढणार आहे. याची घोषणा विश्वास यांनी आधीच केली होती. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पक्षाची बैठक झाली त्यात 20 उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली आणि पहिली यादी तयार करण्यात आली आहे. पक्षाच्या वतीने दुपारी साडे तीन वाजता संजयसिंग आणि मनीष सिसोदीया यांनी माध्यमांसमोर यादी जाहीर केली.
अरविंद केजरीवाल यांनीराजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाचं ‘आयबीएन नेटवर्क’ला दिलेल्या खास मुखातमध्ये त्यांनी आपण लोकसभा लढवायची की नाही, याबद्दलचा निर्णय घेतला नसल्याचे सांगितले आहे. तुम्ही मोदींविरोधात निवडणुक लढविणार का, या प्रश्नावर हसत हसत ते म्हणाले, मला काही हिरो व्हायचे नाही. आमचा लढा भ्रष्टाचाराविरोधात आहे. लोकसभेसाठी जेवढे भ्रष्टाचारी लोक उभे राहातिल त्यांच्या विरोधात आप उमेदवार देणार आहे. आम्ही जनतेला आवाहन करणार हे दोन उमेदवार तुमच्या समोर आहेत, यातील योग्य कोण हे तुम्ही ठरवा. भ्रष्ट नेत्यांना लोकसभेत जाण्यापासून रोखणे हे आमचे ध्येय आहे.
‘आप’ची लोकसभेची पहिली यादी (महाराष्ट्र)
- ईशान्य मुंबई- मेधा पाटकर यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील
- वायव्य मुंबई- मयांक गांधी यांच्याविरुद्ध काँग्रेसचे गुरुदास कामत
- दक्षिण मुंबई- मीरा संन्याल यांच्याविरुद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा
- नाशिक - विजय पांढरे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे समीर भुजबळ
- पुणे- सुभाष वारे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे सुरेश कलमाडी
- नागपूर- अंजली दमानिया यांच्याविरुद्ध भाजपचे नितीन गडकरी.
आप’ च्या उमेदवारांची लोकसभेसाठी पहिली यादी (बाकी)
- चाँदनी चौक (दिल्ली) - पत्रकार आशुतोष काँग्रेसच्या कपिल सिब्बल यांच्याविरुद्ध
- अमेठी - कुमार विश्वास यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या राहुल गांधी
- गुरगाँव - योगेंद्र यादव
- फारुखाबाद - मुकुल त्रिपाठी यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या सलमान खुर्शिद
- मैनपुरी (उत्तर प्रदेश) - बाबा हरदेव यांच्याविरुद्ध समाजवादी पक्षाच्या मुलायम सिंग
- लुधियाना - एच.एस. फुल्का यांच्याविरुद्ध काँग्रेसच्या मनीष तिवारी
- मुरादाबाद - मोहम्मद अझरुद्दीन खालिद परवेझ
- बागपत - सोमेंद्र ढाका यांच्याविरुद्ध अजित सिंग
- दिल्ली साऊथ वेस्ट - जर्नेल सिंग यांच्याविरुद्ध महाबळ मिश्रा
- लालगंज (उत्तर प्रदेश) -डॉ. झियालाल यांच्याविरुद्ध डॉ. बलीराम
- अरुणाचल वेस्ट - हाबांग पायांग
- खांडवा (मध्य प्रदेश) - आलोक अग्रवाल यांच्याविरुद्ध अरुण यादव
- सहारनपूर - योगेश दहिया
- बरगद - लिंगराज