20 फेब्रुवारी : मनसे कार्यकर्त्यांनी आज खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत खारेगाव टोल नाका फोडला. या टोलफोड प्रकरणी ठाणे पोलिसांनी 100 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. तसंच टोल फोड करणार्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी राज ठाकरे यांच्या समोरच चोप दिला.
दरम्यान, मनसेच्या महिला पदाधिकार्याला टोल नाक्यावरील कर्मचार्यानं शिवीगाळ केल्यानं तोडफोड केल्याचा दावा मनसे कार्यकर्त्यांनी केलाय.
कल्याणच्या मनसेच्या महिला पदाधिकारी कल्पना कपोते, शगुप्ता पिंपळे, अर्चना चिंदरकर कळवा यांनी कळव्याकडे जाताना टोल भरण्यास नकार दिला होता. त्यावरुन टोलनाक्यावरील लाखन पगारे या कर्मचार्यानं महिला पदाधिकार्यांना शिवीगाळ केल्याचा दावा मनसेनं केलाय. त्यानंतर संतप्त झालेल्या मनसे कर्मचार्यांनी खारेगाव टोलनाका फोडण्याचं आंदोलन केलं.
त्याचवेळी राज ठाकरे नाशिक दौर्यावर जात होते, त्यामुळे टोलनाक्याची तोडफोड राज ठाकरेंच्या उपस्थितीतच करण्यात आली. दरम्यान, खारेगाव टोल नाक्यावरील लाखन पगारे आणि आणखी एका कर्मचार्याला कळवा पोलिसांनी अटक केलीय.