17 मार्च : मुंबईकरांना आजपासून भायखळातील राणीच्या बागेत पेंग्विनच्या दर्शनाचा आनंद लुटता येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर पर्यटकांना पेंग्विन्सना ‘याची देहि याची डोळा’ पाहता येणार आहे.
सात महिन्यांपूर्वी हम्बोल्ट प्रजातीच्या पेंग्विनना राणीच्या बागेत आणण्यात आले होते. तेव्हापासून पेंग्विन केव्हा पाहायला मिळणार, याची उत्सुकता मुंबईकरांना लागून राहिली होती. मात्र, अनेक अडथळ्यांमुळे पेंग्विन दर्शनाचा योग लांबणीवर पडत होता. मात्र, आता निवडणुका झाल्यानंतर पेंग्विन दर्शन पर्यटकांना खुले करण्यासाठी पालिकेला मुहूर्त मिळाला आहे.
दरम्यान, पेंग्विनना पाहण्यासाठी पर्यटकांना किती रूपये शुल्क द्यावे लागणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, आतापर्यंतच्या चर्चेनुसार मोठ्यासाठी 10 रुपये तर 12 वर्षांखालील लहानांसाठी 50 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, शिवसेनेने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता.
दक्षिण कोरियाहून 8 पेंग्विन्सना राणीच्या आणल्यानंतर तीन महिन्यांतच त्यातील एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर या पेंग्विनना परत आपल्या मायदेशी पाठवण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. मात्र, हाय कोर्टाने ही मागणी फेटाळून लावलीये. त्यासोबतचं, पेंग्विन आणल्यामुळे मुंबई महापालिका निवडणूकीत शिवसेनेला याच मुद्द्यावरून धारेवरही धरण्यात आलं होतं. मुंबईतील मुलभूत सुविधा पूर्ण नसताना, पेंग्विनवर कोट्यवधींचा खर्च का, असेही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, अखेर सर्व अडथळे पार करत मुंबईकरांना पेंग्विनचं दर्शन घेता येणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv