24 ऑक्टोबर: शनी चौथऱ्यानंतर आता मुंबईतील हाजी अली दर्ग्यातील मजारपर्यंत जाण्याचा महिलांचा मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टात आज( सोमवारी) झालेल्या सुनावणीदरम्यान हाजी अली ट्रस्टच्या विश्वस्तांनी कोर्टात याबाबतची हामी दिली आहे. त्यामुळे आता महिलादेखील हाजी अली दर्ग्यातील मजारपर्यंत जाऊ शकणार आहेत. त्याचबरोबर, मजारपर्यंत जाण्यासाठी महिलांसाठी वेगळा मार्ग तयार करण्यात येणार असून त्यासाठी 2 आठवड्यांची मुदत देण्यात यावी, अशी विनंती हाजी अली ट्रस्टने कोर्टात केली. तर ही मागणी कोर्टानेही मान्य केली आहे.
यासंदर्भात भारतीय मुस्लिम महिला आंदोलन या स्वयंसेवी संस्थेने हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. ही याचिका मान्य करत हायकोर्टाने महिलांना दर्ग्यात प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. ज्या ठिकाणी पुरुषांना जाण्याची परवानगी आहे, तिथे महिलांनाही जाण्याचा अधिकार आहे, असे म्हणत मुंबई हायकोर्टाने हाजी अली दर्ग्यात महिलांवरील बंदी उठवली होती. याबाबत 26 ऑगस्ट 2016 रोजी मुंबई हायकोर्टाने याबाबत निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात हाजी अली ट्रस्टने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
ट्रस्टच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावेळी ट्रस्टनं आपल्या भूमिकेत बदल करत महिलांनी मजारपर्यंत जाण्यास आमची काहीही हरकत नसल्याचं न्यायालयाला सांगितलं. ‘महिनाभरात याची अंमलबजावणी सुरू केली जाईल,’ असं आश्वासनही ट्रस्टनं न्यायालयाला दिलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

)







