27 जानेवारी : भाजपकडून राज्यसभेसाठी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. आज (सोमवारी) दिल्लीत भाजपनं ही घोषणा केली. मुंबईतल्या भाजपच्या प्रदेश मुख्यालयात गोपीनाथ मुंडे यांनी रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर करत असल्याचं जाहीर केलं. यावेळी रामदास आठवले ही हजर होते.
आठवलेंना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय हा ऐतिहासिक, जसे श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. त्या इतिहासाची पुनरावृती महायुती करत आहे असं गोपीनाथ मुंडे म्हणाले. तसंच आरपीआय आता महायुतीबरोबर एनडीएचाही घटक पक्ष झाल्याचंही मुंडे यांनी म्हटलंय.
उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल रामदास आठवले यांनी भाजपच्या नेत्यांचे आभार मानले. दरम्यान, रामदास आठवले यांची राज्यसभेची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झाल्यानं आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. औरंगाबादेतील क्रांती चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला आणि एकमेकांना पेढे भरवले.या प्रसंगी आरपीआयचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.