यवतमाळ - 08 एप्रिल : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळल्याची घटना यवतमाळच्या आठवडी बाजार परिसरात घडली. या घटनेत विवाहित अश्विनी ही गंभीररित्या जळाली असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. तिला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आलंय.
नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील अश्विनी श्रीराम देंगे हीचा विवाह 4 वर्षांपूर्वी प्रशांत लुटे या तरुणाशी झाला. कालांतराने या दाम्पत्याला एक मुलगी ही झाली. मात्र, सुरुवातीपासूनच प्रशांत हा माहेरहून पैसे आणण्यासाठी अश्विनीला त्रास देत होता. अलीकडच्या काळात तो अश्विनी चारित्र्यावर सुद्धा संशय घेत होता. त्यातूनच तिला बेदम मारहाण करायचा. काल संध्याकाळच्या सुमारास शेजार्यांना प्रशांतच्या घरातून धूर निघत असतांना दिसला. तेव्हा आजू-बाजूचे रहिवासी तिकडे आग विझविण्यासाठी धावले. तेव्हा त्यांना प्रशांतची पत्नी अश्विनी जळत असतांना दिसली. यावरून काही लोकांनी तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि घटनेबाबत माहिती दिली. तो पर्यंत अश्विनी गंभीररित्या भाजली. नातेवाईकांनी तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं. त्याठिकाणी मृत्यू पूर्व जबानी घेतली असता पतीसह सासरकडच्या लोकांनी रॉकेल टाकून जाळलं असं अश्विनीने आपल्या जबानीत म्हटलंय. या वरून पोलिसांनी अश्विनीचा पती प्रशांत लुटे याला अटक केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv