28 फेब्रुवारी : वादविवाद, मोर्चे, भाषणं, ट्विटर वॉर यामुळे सध्या दिल्ली विद्यापीठ खूपच गाजतंय. काही महिन्यांपूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा परिसर अशाच वादविवादाने दणाणून गेला होता. दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी आणि शिक्षकांनी इथल्या हिंसक आंदोलनांचा निषेध करण्यासाठी आज मोर्चा काढला होता. ‘इस गुंडागर्दी से चाहिये आजादी’ अशा घोषणा हे मोर्चेकरी देत होते.
दिल्ली विद्यापीठात हा वाद सुरू झाला तो रमजा कॉलेजमधल्या हिंसक निदर्शनानंतर. ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जेएनयूचा विद्यार्थी उमर खलिदला आमंत्रण दिलं आणि या संघर्षाला निमित्त मिळालं. यावरून अभाविप आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनमध्ये झालेल्या वादाला हिंसक वळण लागलं.
या सगळ्यात भर पडली ती गुरमेहर कौर या विद्यार्थिनीने केलेल्या ट्विटची. ‘मी दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे, मी अभाविपला घाबरत नाही आणि मी एकटी नाही. अवघा देश माझ्यासोबत आहे’ असं ट्विट तिने केलं होतं. पण तिच्या या पोस्टनंतर तिच्याविरुद्ध जोरदार ट्विटरवॉर सुरू झालंय. एवढंच नाही तर तिला बलात्काराच्या धमक्याही आल्या.
गुरमेहर कौर ही कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकाची मुलगी आहे. पण या ट्विटवरून गुरमेहेर ही देशद्रोही आहे, असा प्रचार तिच्याविरद्ध केला जातोय. याआधीही गुरमेहरने भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता नांदावी, असं आवाहन केलं होतं. माझ्या वडिलांचा बळी युद्धाने घेतला, पाकिस्तानने नव्हे, असं तिने म्हटलं होतं.
गुरमेहरच्या वक्तव्यावर क्रिकेटर वीरेंद्र सहवागने एक टिट्वट केलंय. मी पाकिस्तानविरुद्ध ट्रिपल सेंच्युरी केली नाही. माझ्या बॅटने केली, असं त्याने उपरोधिकपणे म्हटलं.
कुस्तीपटू योगेश्वर दत्तनेही या आगीत तेल ओतलं. त्याने तर हिटलर, ओसामा बिन लादेन, सलमान खान यांचे फोटो दाखवले. त्याच्या या ट्विटमध्ये हिटलर म्हणतो…मी ज्यूंना मारलं नाही, ते गॅसमुळे मृत्युमुखी पडले. ओसामा बिन लादेन म्हणतो…मी लोकांना मारलं नाही.. ते बॉम्बमुळे मारले गेले. एवढंच नाही तर काळवीट सुद्धा म्हणतं.. मला सलमान खानने मारलं नाही. बंदुकीच्या गोळीने मारलं !
सोशल मीडियावर एवढी टीका झाल्यानंतर आता गुरमेहरने या सगळ्या आंदोलनातून माघार घेतलीय. या सगळ्या वादात मी, जेवढं करू शकले ते केलं,असं टि्वट तिने केलंय. पण गुरमेहरने माघार घेतली असली तरी आता यातलं राजकारण बरंच पुढे गेलंय. विद्यार्थी संघटनांच्या या पावित्र्यामुळे जेएनयूपाठोपाठ दिल्ली युनिव्हसिटीही सध्या राजकारणाचा आखाडा बनलीय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv