12 सप्टेंबर : राष्ट्रवादीने काँग्रेस पक्षाचे जेवढे नुकसान काँग्रेसने केले, तेवढे कोणीही केले नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेचे प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच राष्ट्रवादीची बदनामी करण्याची कोणतीच कसर सोडली नाही. ‘खुद तो डुबे सनम, हमको भी ले डुबे’ अशा पद्धतीची काँग्रेसची राष्ट्रवादीसोबत खेळी राहिली, अशा शब्दात प्रफुल्ल पटेल यांनी अकोल्यातील कार्यकर्त्या मेळाव्यात काँग्रेसवर शरसंधान साधलं. महेश भवनात खा. पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, काँग्रेस पक्ष आपणच अल्यसंख्याकाचे कैवारी असल्याच्या अविर्भावात आहे. काँग्रेसशिवाय दलित आणि अल्पसंख्याकांना दुसरा पर्याय नाही असा या पक्षाचा गैरसमज आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र तसे नाही. अल्पसंख्याकाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने वेळप्रसंगी संघर्षही केला आहे. ही बाब सलत असल्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेहमीच पाय ओढले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असून कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं असे आदेश पटेल यांनी कार्यकर्त्यांना दिले. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भात भरपूर वाव आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार हे सतत विदर्भातील शेतकर्यांच्या पाठीशी उभे राहतात. कर्जमाफीपासून ते कमी व्याजदराने कर्ज मिळावे म्हणून पवारांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. पवारांसारखे दुरदृष्टी असणारे नेतृत्व ही पक्षाची खरी ताकद असून कार्यकर्त्यांनी यामधून ऊर्जा घेऊन काम केल्यास त्यांना कुणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी दिला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv