17 फेब्रुवारी : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राकेश मारिया यांची नियुक्ती झाली खरी पण त्यामुळे अनेक वादांना तोंडही फुटलंय. सेवाज्येष्ठता डावलल्यामुळे विजय कांबळे नाराज झाले असून त्यांनी ठाण्याचं आयुक्तपद नाकारलं आहे.
महामार्ग पोलीस विभागाचे अतिरिक्त महासंचालक असलेले विजय कांबळेंनी रजेवर जायचा निर्णय घेतला असल्याचं समजतंय. मुंबईच्या आयुक्तपदी असलेल्या अधिकार्याहून कनिष्ठ अधिकारी ठाण्याच्या आयुक्तपदी नेमण्याचा प्रघात आहे. मात्र मारियांहून सेवाज्येष्ठता असूनही आयुक्तपद न मिळाल्याने कांबळे नाराज असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे जावेद अहमदही मारियांच्या नियुक्तीनं नाराज झाले आहेत. तर रविवारी झालेल्या महायुतीच्या सभेतही कांबळेंना डावलण्याचं राजकारण झाल्याचा आरोप भाजपचे नेते विनोद तावडेंनी केलाय. दरम्यान, राज्यातल्या पोलीस अधिकार्यांच्या बदल्यांबाबत कोणताही घोळ नसून बदल्या या कायद्याप्रमाणंच झाल्या असल्याचं स्पष्टीकरणही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय.