31 मार्च : ‘काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे फसवणूक’ असल्याची घनाघाती टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज (सोमवार) केली. ‘काँग्रेसचे घोषणापत्र म्हणजे खरं म्हणजे धूळफेक असल्याचा टोला मोदी यांनी लगावला. त्याबरोबरच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही मोदी यांनी यावेळी लक्ष्य केले. ‘भारतीय मच्छिमारांची हत्या करणार्या दोन इटालियन नौसैनिकांबद्दल त्या काहीच का बोलत नाहीत’ असा प्रश्न विचारत त्यांनी पुन्हा एकदा सोनिया गांधींच्या परदेशी वंशाचा मुद्दा उकरून काढला. निडो तानिया या अरुणाचलच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर सोनिया गांधींनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती अशी टीकाही त्यांनी केली.
गांधी यांनी नुकतीच विरोधक नुसते मोठमोठ्या गप्पा मारतात अशी टीका केली होती. या टीकेस मोदी यांनी आज उत्तर दिलं आहे.
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आसाममध्ये सभा सुरू आहे. त्यापूर्वी त्यांनी अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसवर हल्लाबोल केला.
दरम्यान , भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आणि संसदीय मंडळाची आज बैठक होतेय. उत्तर प्रदेशमध्ये अमेठीतून राहुल गांधींच्या विरोधात कोणी लढायचं आणि त्याचबरोबर रायबरेलीमधून कुणाला उमेदवारी द्यायची याबद्दल आज निर्णय होण्याची शक्यता आहे. राहुल गांधींच्या विरोधात भाजप स्मृती इराणींना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. 3 ए्प्रिलला भाजपचा जाहीरनामा येणार आहे. त्याबद्दलही या बैठकीत चर्चा होईल. आंध्र प्रदेशमध्ये तेलुगु देसम पक्ष आणि तेलंगणा राष्ट्र समिती यांच्याशी युती करण्याबद्दलही निर्णय होईल.