09 जानेवारी : महेंद्रसिंग धोनीने एकाएकी वनडे आणि टी-20 क्रिकेटमधून कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णयावरून आता नवा वाद पुढे येताना दिसतोय. नेटवर्क 18ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनीवर कर्णधारपद सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्याने स्वत:च्या इच्छेने कर्णधारपद सोडले नाही.
4 जानेवारीला धोनीने अचानकपणे वनडे आणि टी-20च्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याच्या निर्णय जाहीर केल्यानंतर सगळ्यांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता. पण बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवड समितीनं धोनीला कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिल्याचं समजतंय.
बीसीसीआय निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी नागपूरमध्ये झारखंड आणि गुजरात रणजी सामन्यादरम्यान धोनीची भेट घेतली आणि संध्याकाळी धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. दरम्यान धोनी कर्णधारपद सोडायला तयार नव्हता, असंही सांगण्यात येतय.
विशेष म्हणजे, धोनीने आपला निर्णय माध्यमांसमोर येऊन न देता बीसीसीआयला केवळ पत्राद्वारे कळवला. निवड समितीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयने धोनीच्या निर्णयाचे प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते. धोनी अद्याप आपल्या निर्णयावर जाहीररित्या बोललेला नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv