05 मार्च : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी लोकसभेच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे कधी रिक्षाचालकांशी संवाद साधता तर कुठे महिल्या मेळाव्यात त्यांचा ‘किस’ घेतला जातो. पण औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी आपल्याच पक्षाचे ‘आदर्श’ नेते अशोक चव्हाण यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर एकत्र आले. नुसते दिसले नाही तर त्यांचं कौतुकही केलं.
राहुल गांधी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौर्यावर आहेत. आज दुपारी त्यांची औरंगाबादमध्ये त्यांची सभा पार पडली. राहुल गांधींच्या स्टेजवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबरच काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते. पण आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी आरोप असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही राहुल यांच्या सभेत स्थान देण्यात आलं होतं.
एवढंच नाही तर राहुल गांधींनी त्यांच्याशी हातही मिळवला आणि आपल्या भाषणात त्यांचं नावही घेतलं. या सभेतल्या भाषणात राहुल गांधींनी लोकपाल विधेयक, भ्रष्टाचारविरोधी विधेयकांचा उल्लेख केला. भाजपनं ही विधेयकं रोखून धरली, असा आरोपही राहुल यांनी केला.तसंच येडियुरप्पांच्या भ्रष्टाचाराचा दाखल देत भाजपवर तोफ डागली. पण भ्रष्टाचाराच्या विरोधी भूमिका घेणार्या राहुल गांधींना त्याच स्टेजवर बसलेल्या अशोक चव्हाण यांच्यावरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा विसर पडलेला दिसतो. इतकंच काय तर अशोक चव्हाण यांना लोकसभा निवडणुकीचं तिकिट दिलं जाण्याचीही चर्चा सुरू आहे.