05 डिसेंबर : एकीकडे महापरिनिर्वाणदिन चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी जमू लागले आहे. तर दुसरीकडे, इंदू मिलमध्ये स्मारकाचा वाद संपलेला नाही. राज्य सरकारने उद्या इंदू मिलमध्ये भूमिपूजन करावं अन्यथा आम्हीच मिलचा ताबा घेऊन भूमिपूजन करणार असल्याचं आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी जाहीर केलंय.तर भूमिपूजनाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी स्पष्ट केलंय.
बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या साडेबारा एकर जमीन हस्तांतराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीय त्यामुळे स्मारकाचा विषय मार्गी लागला आहे मात्र महापरिनिर्वाणदिनीच इंदू मिलमध्ये भूमिपूजन करून राज्य सरकारने स्मारकाच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी आठवले यांनी केली.
त्यामुळे उद्या इंदू मिलमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हजारो आरपीआयचे कार्यकर्ते इंदू मिलमध्ये घुसून भूमिपूजन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिलबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय.