19 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यामध्ये एक हजार टन सोन्याच्या खजिन्याचा शोध सुरू असून खरंच सोनं सापडणार का याची उत्सुक्ता लागली. सोन्याचं उत्खनन कुणाच्या तरी स्वप्नावर अवलंबून नाही तर त्याला शास्त्रीय आधार आहे असं सांस्कृतिक मंत्रालयानं स्पष्ट केलंय. लखनौपासून जवळच असलेल्या डौंडिया खेडा गावात धातूंचं अस्तित्व असल्याचं भूगर्भ विभागाला आढळून आलंय. त्यामुळेच हे उत्खनन सुरू केल्याचा दावा सांस्कृतिक मंत्रालयानं केलाय. हे उत्खनन पूर्ण व्हायला 2 ते 3 आठवडे लागतील, असंही सांगण्यात आलंय. एका साधूच्या स्वप्नानंतर पुरातत्व विभागाकडून हे उत्खनन सुरू झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. त्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक मंत्रालयानं स्पष्टीकरण दिलंय. डौंडिया खेडा गावातील शोभन सरकार या साधूला गावातल्या 19 व्या शतकातील राजा राव रामबख्श सिंग यांच्या किल्ल्याखाली 1 हजार टन सोनं पुरलेलं असं स्वप्न पडलं होतं. त्यांच्या स्वप्नावर सामान्य लोकच नाही, तर थेट सरकारी यंत्रणाही या स्वप्नावर विश्वास ठेवून कामाला लागली आहे. पुरातत्व विभागाने शुक्रवारी सकाळपासून सोन्याच्या खजिन्याच्या शोधासाठी खोदकामाला सुरुवात केलीये. पुरातत्व विभागाचे अधिकारी गेल्या पाच दिवसांपासून या गावात तळ ठोकून आहे. या किल्ल्याखाली खरंच 1 हजार टन सोनं आहे का? आणि ते सापडेल का याकडे देशाचं लक्ष या गावाकडे लागलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.