**
21 ऑक्टोबर :**सिंचन घोटाळ्याप्रकरणी भाजपनं आक्रमक भूमिका घेतलीय. आज औरंगाबादमध्ये एक मोठा मोर्चा काढून आणि जोरदार घोषणाबाजी करत भाजपनं या घोटाळ्याशी संबंधित तब्बल 14 हजार पानी कागदपत्रं चौकशी समितीला सादर केलेत. या पुराव्याची सखोल चौकशी झाली तर अजित पवार आणि सुनील तटकरे यांना लालूंप्रमाणे जेलची हवा खावी लागेल, याचा भाजपनं पुनरुच्चार केलाय. दरम्यान, या प्रकारामुळे राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे. सिंचनाच्या टक्केवारीचा वाद वाढता वाढतामध्ये श्वेतपत्रिका आली आणि आता चौकशी सुरू झाली. पण चौकशी नेमकी कशाची, यावरून बरीच हमरी-तुमरी झाली. अखेर कोर्टाच्या मध्यस्थीनंतर चितळे समितीने विरोधकांकडची कागदपत्रं मागितली आणि भाजपनं आज 14 हजार पानी पुरावे चितळे समितीला वाजत-गाजत सादर केले. मुळात सिंचन घोटाळा चर्चेत आला तो विदर्भ पाटबंधारे विकास महामंडाळाच्या प्रकल्पांच्या घोळामुळे. अव्वाच्या सव्वा रकमेची टेंडर मनमनीपणे जारी करण्यात आले. याची आधी मेंढेगिरी समिती आणि नंतर वडनेरे समितीने चौकशी केली आणि यात थोडेथोडके नाही तर आधी 76 आणि नंतर 45 अधिकार्यांना दोषी धरण्यात आलं. पण, जे खरे सूत्रधार आहेत. ते मात्र मोकाटच असल्याचा आरोप भाजपने केलाय. आघाडीच्या 13 वर्षांच्या काळात 70 हजार कोटी रुपये सिंचनावर खर्च करण्यात आले. पण, सिंचनाचे पाट वाहण्याऐवजी ठेकेदार आणि नेत्यांच्याच तुंबड्या भरल्या गेल्या. आता खरे गुन्हेगार कोण, याचा छडा माधव चितळेंना लावायचाय. सिंचन घोटाळ्यावरून भाजपचं हे पुरावे प्रकरण राष्ट्रवादीला चांगलंच झोंबलंय. युतीच्या काळापासूनच सिंचन घोटाळ्याला सुरुवात झाली, असा दावा राष्ट्रवादीने केलाय. खरं तर सिंचन घोटाळ्यात सर्वपक्षीय संगनमत ठिकठिकाणी पहायला मिळतंय. त्यामुळे घोटाळ्याची चौकशी फक्त आरोप-प्रत्यारोपांच्या चर्चेत विरुन जाऊ नये, अशी सामान्य जनतेची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.