31 जुलै : प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी केलेल्या ट्वीटचा वाद आता चांगलाच पेटलाय. स्वतंत्र मुंबई का नको, असा ट्वीट शोभा डे यांनी केला होता. पण शिवसेना आता या मुद्द्यावर आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शोभा डे यांना बेईमान ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा हा डाव आहे. मुंबईचंच खाऊन महाराष्ट्राशी शोभा डे यांनी बेईमानी केलीय. हा महाराष्ट्र द्रोह आहे अशा आशयाचं पत्रकच संजय राऊत यांनी काढलंय.
शोभा डे यांच्या मुंबईबाबतच्या ट्वीटवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिखट प्रतिक्रिया दिलीय. ‘मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करणं म्हणजे घटस्फोट घेण्याइतकं सोपं नाही’ असा टोला त्यांनी शोभा डे यांना लगावलाय. दरम्यान, शोभा डे यांनी वाद सुरू झाल्यामुळे सारवासारव केलीय. आपण गंमतीनं उपहासानं असं ट्वीट केलं होतं असा खुलासा डे यांनी केलाय.
शोभा डे यांचं ट्विट ‘महाराष्ट्र आणि मुंबई??? का नको? मुंबईनं नेहमीच आपला वेगळेपणा राखलाय. शक्यता अनेक आहेत.’