मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

रिव्ह्यु : फुल्ल टू टाइमपास !

रिव्ह्यु : फुल्ल टू टाइमपास !

अमोल परचुरे, समीक्षक

टाइमपास टू...आता नाव टाइमपास असलं तरी दिग्दर्शक आहे रवी जाधव, लेखकांमध्ये प्रियदर्शन जाधव बरोबर क्षितिज पटवर्धनचंसुद्धा नाव आहे, त्यामुळे नुसताच टाइमपास असेल असं म्हणता येणार नाही. जी लव्हस्टोरी पहिल्या भागात अपूर्ण राहिली होती तिचं पुढे काय होतं हे या दुसर्‍या भागात बघायला मिळतं. पहिल्या टाइमपासची पुण्याई गाठिशी असल्यामुळे दुसरा टाइमपाससुद्धा बॉक्स ऑफिसवर भरपूर गल्ला जमवणार असंच बोललं जातंय, ऍडव्हान्स बुकिंगनेसुद्धा तेच संकेत दिलेले आहेत, पण बॉक्स ऑफिसचं गणित थोडं बाजूला ठेवून विचार करुयात सिनेमा कसा आहे, सिनेमात खास काय काय आहे आणि कुठे काही त्रुटी राहिलेल्या आहेत का ते... पहिल्या टाइमपासशी तुलना केली तर टाइमपास टू एक पाऊल पुढे आहे असं नक्कीच म्हणता येईल. व्यावसायिक सिनेमाची सगळी गणितं इथे जुळलेली आहेत, लव्हस्टोरी आहेच, कॉमेडी ट्रॅक आहे, आयटम साँगसुद्धा आहे, थोडा धांगडधिंगासुद्धा आहे..फुल्ल टू मनोरंजनाची अपेक्षा घेऊन थिएटरमध्ये येणार्‍या प्रेक्षकांना जे काही हवंय ते सगळं यामध्ये आहे, आणि फक्त मनोरंजनच नाही तर तरुणाईसाठी उपदेशाचे चार शब्दही आहेत.

काय आहे स्टोरी ?tp 2 (3)

पहिला टाइमपास जिथे संपतो, तिथून काही वर्षांनंतर टीपी टू (टाइमपास टू) सुरू होतो. दगडू आणि प्राजक्ता अजूनही एकमेकांना विसरलेले नाहीत, पण दोघांनाही एकमेकांचा ठावठिकाणा काही माहित नाहीये. दगडू आता ठाणा-डोंबिवलीमधून बाहेर पडून वरळी कोळीवाड्यात पोचलाय, त्याने आता साईबाबांच्या सीडींचा बिझनेस सुरू केलाय, प्राजक्ता आता कोकणात आहे, माधव लेले उर्फ शाकालच्या तालमीत संगीताचे संस्कार तिच्यावर झालेत आणि आता याच क्षेत्रात काहीतरी करुन दाखवण्यासाठी तिला मुंबई खुणावतेय..असे हे दोन तीरांवर असलेले प्रेमी जीव कसे भेटतात आणि पुढे काय काय घडतं ती धमाल सिनेमातच बघावी लागेल.

नवीन काय ?

tp 2 (4)इंटरव्हलपर्यंत टाइमपास टू चांगली धमाल उडवतो. दगडू आणि शाकालमधली नवी केमिस्ट्री हे या सिनेमाचं मुख्य आकर्षण म्हणता येईल. पहिल्या भागात शाकालची दहशत दिसली होती, दुसर्‍या भागात शाकाल म्हणजेच माधव लेलेमध्ये मुलीबद्दलची काळजी दिसते, कोकणातला माणूस फणसासारखा असतो. म्हणजे नेमकं काय ते टाइमपास टू मध्ये बघायला मिळेल. शाकाल असेल किंवा दगडू आणि प्राजक्ता असतील यांच्या व्यक्तिरेखा खूपच विचारपूर्वक फुलवण्यात आल्या आहेत. फक्त दगडू मोठा झाल्यावरही छोटा दगडू जरा जास्तच मध्येमध्ये येतोय असं जाणवतं. इंटरव्हलपर्यंत जेवढी धमाल आहे. तितकी मजा इंटरव्हलनंतर येत नाही. इंटरव्हलनंतरच्या भागात सिनेमा लांबल्यासारखा वाटतो, शेवटाचा अंदाज आल्यानंतर आता क्लायमॅक्स कधी होणार याचीच वाट बघत बसावं लागतं. टीपी टू चा आणखी एक मायनस पॉईंट म्हणजे यातली गाणी...पहिल्या टीपीमध्ये गाणी हा स्ट्राँग पॉईंट होता पण टीपीटू मध्ये गाणी विशेष लक्षात राहण्यासारखी नाहीत, कदाचित त्यामुळेच पूर्ण सिनेमाभर मला वेड लागलेचे सूर बॅकग्राऊंडला घुमत राहतात.

परफॉर्मन्स

vlcsnap-2015-03-14-15h00m16s193अभिनयाबद्दल बोलायचं तर खरी कसोटी होती ती प्रियदर्शन जाधवची...आत्तापर्यंत सिनेमात छोट्या-मोठ्या भूमिका त्याने केल्या होत्या, पण रंगभूमीवरची उर्जा मोठ्या पडद्यावर दाखवण्याची संधी त्याला मिळाली नव्हती. टीपी टू मधून त्याने ही कसर भरुन काढलीये. दगडूची बिनधास्त सळसळणारी एनर्जी त्याने उत्तमरित्या साकारलेली आहे. त्याची व्यक्तिरेखा लिखाणातच काही ठिकाणी कमजोर आहे, पण बाकी परफॉर्मन्समध्ये प्रियदर्शनने बर्‍यापैकी बाजी मारलीये. प्रिया बापटवरसुद्धा जबाबदारी मोठी होती. केतकी माटेगावकरने साकारलेली प्राजक्ता आता मोठी झाल्यावर कशी वागेल याचा नीट विचार करुन प्रियाने चांगली कामगिरी केलीये. प्रियदर्शन आणि प्रिया या दोघांच्या खंद्यावर असलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली असं नक्कीच म्हणता येईल.

शाकालबद्दल...

tp 2 (1)पण या सिनेमात खरी बाजी मारलीये ती वैभव मांगलेने... पहिल्या टाइमपासमधला शाकाल ते दुसर्‍या भागातला वय झालेला पिता माधव लेले, हेकेखोरपणा अजून कायम आहे, पण तरीही स्वभावातलं वेगळेपण वैभवने अफलातून दाखवलंय. इमोशनल माधव लेले लिहीलायही चांगला... बाकी पहिल्या टाइमपासच्या तुलनेत टीपी टू आणखी ग्रँड झालाय, ग्रँड दिसतो...कोकणाचं नयनरम्य दर्शन असेल किंवा वरळीतला कोळीवाडा असेल, सिनेमॅटाग्राफर वासुदेव राणे यांचं काम एक नंबर झालेलं आहे. थोडा सिनेमा आणखी एडिट झाला असता, गाणी आणखी मस्त झाली असती तर टीपी टू ची रंगत नक्कीच आणखी वाढली असती..

रेटिंग 100 पैकी 60

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Prathmesh Parab, Priya bapat, Priyadarshan Jadhav